फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाली होती. पण यामुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसलाय. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच ४४ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
यासोबतच काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क एक स्थानानं खाली घसरला. सोमवारी या कंपनीच्या शेअर्सची मोठी पडझडही झाली. फेसबुकचे शेअर्स ४.९ टक्क्यांनी घसरले. तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भाव पडले.
सप्टेंबरच्या मध्यापासून कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत घसरलेत. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती १२ हजार १६० कोटी डॉलर्सवर आलीय.
मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असं मार्कनं म्हटलं आहे.
तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉटअॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा खंडित झाल्याचं सांगण्यात आलं. तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या सेवेत व्यत्यय आल्याचे सांगण्यात येत असले तरी कंपनीने नेमके कारण मात्र उघड केलेलं नाही.
हेही वाचा