Advertisement

वाढत्या उष्म्याचा हापूसवर परिणाम, वातानुकूलीत गाड्यांतून आंबा थेट दारात!

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते शुभारंभ, पहिल्या टप्प्यात मुंबईत ३ गाड्या दाखल

वाढत्या उष्म्याचा हापूसवर परिणाम, वातानुकूलीत गाड्यांतून आंबा थेट दारात!
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत असल्यानं नागरिकांची काहिली होत आहे. हवामानातील बदल आणि वाढत्या उष्म्याचा फटका हापूसलाही होत आहे.

एरवी सोनेरी झळाळी असणारा आंबा तापमान वाढीमुळे काळवंडलेला, डाग पडलेला दिसतो. पण आंबा प्रेमींना कोकणातील अस्सल हापूस आंब्याची गोडी चाखता यावी, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या उत्तम दर्जाच्या हापूसचा आनंद घेता यावा यासाठी 'मायको'नं पाऊल उचललं आहे.

ग्राहकांना उत्तम प्रतिचा, चांगला आंबा घरपोच मिळावा यासाठी 'मायको'नं वातानुकूलित गाड्यांची ( रिफर व्हॅन्स) सोय केली आहे. आंबा खराब होऊ नये आणि आंब्याचा दर्जा कायम रहावा यासाठी लागणारे विशिष्ट तापमान या गाडीचे असेल. या गाड्यांचा शुभारंभ परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी 'ग्लोबल कोकण'चे संस्थापक संजय यादवराव, 'मायको'च्या सह संस्थापक राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे, सुनयना रावराणे आणि 'ग्लोबल कोकण'चे संयोजक किशोर धारिया उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या परिश्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत 'मायको' या ग्लोबल स्तरावरील मँगोटेक प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. http://www.mykofoods.com/ या संकेतस्थळामुळे कोकणातील जीआय टॅग हापूस जगभरातील आंबा प्रेमींना सहज उपलब्ध होत आहे.

''कोकणातील शेतात पिकलेला हापूस ग्राहकापर्यंत जशाचा तसा पोहोचावा यासाठी 'मायको'द्वारे वातानुकूलित गाड्यांची जी सोय करण्यात आली आहे ती अतिशय चांगली आहे. आंबे पिकवण्यासाठी त्यावर रसायन फवारले जातात, केमिकलचा वापर होतो अशा अनेक अफवा ऐकायला येतात. अशा कोणत्याही अफवा लोकांपर्यंत पोहोचू नये आणि आंब्याची सुरक्षित वाहतूक करत नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल हापूस ग्राहकापर्यंत पोहोचावा यासाठीचा हा उपक्रम वाखणण्याजोगा आहे. 

तसंच 'मायको'द्वारे पाठवल्या जाणाऱ्या आंब्याच्या प्रत्येक पेटीवरील क्युआर कोड स्कॅनिंगच्या माध्यमातून शेतात आंबा कसा पिकवला जातो, किती मेहनत केली जाते अशी सर्व पारदर्शक प्रक्रिया ग्राहकांना व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. 

कोकणातील शंभर शेतकऱ्यांनी एकत्र येत बनवलेल्या देशातील पहिल्याच 'मायको' या मँगोटेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतातील हापूस थेट जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.

''हापूस हाताळण्यासाठी अतिशय नाजूक फळ आहे. हापूसची बाजारपेठेत किंवा इतर प्रवासावेळी ने-आण करताना खूप काळजी घ्यावी लागते. योग्य ती काळजी न घेतल्यानं आंब्यांचं नुकसान होतं. पण ग्राहकांना उच्च प्रतीच्या, चांगल्या, दर्जेदार आंब्याची गोडी चाखता यावी यासाठी वातानुकूलित गाड्यांची सोय करण्यात आली आहे.'' असं 'ग्लोबल कोकण'चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले.

''हापूसची साल ही अतिशय पातळ असते. तीव्र उन्हामुळे आंब्यांची साल भाजल्यानं अनेकदा आंबे काळवंडले जातात. त्यामुळे खराब झालेला आंबा फेकून द्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांचेही प्रचंड आर्थिक नुकसान होतं. शेतकरी, आंबा बागायतदार यांचे नुकसान होऊ नये आणि ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा आंबा मिळावा यासाठी आम्ही वातानुकूलित गाड्यांची सोय केली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत ३ गाड्या दाखल झाल्या असून ठाणे आणि नवी मुंबईतही या गाड्यांची सेवा येत्या काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे.'' असे 'मायको'च्या सह संस्थापक सुप्रिया मराठे म्हणाल्या.

''मायकोच्या वेबसाईटवरून ग्राहकांनी आंबे ऑनलाईन ऑर्डर केल्यावर त्यांना या गाड्यांमधून आंब्यांची घरपोच डिलिव्हरी केली जाईल.'' असंही त्या पुढे म्हणाल्या. 

गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठ बंद झाली असतानाही शेतकरी थांबला नाही. उलट त्यांनी आंब्यांची थेट विक्री केल्यानं त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट भाव मिळाला.




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा