मुलुंड - समाजातील गरजूंना मदत करणे या उद्देशाने सुरू केलेल्या प्रणव आधार या संस्थेने आपली दुसरी शाखा सुरू केली आहे. या शाखेचे उद्घाटन नगरसेवक आणि सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलेे. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शिंदे यांच्यासह समाजाच्या विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. शाखा मुंबई मुलुंड मधील तांबेनगर येथे स्थित आहे. कोणालाही अडचण असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
समाजातील गरीब, गरजू घटकांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रकाश शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी प्रणव आधार एनजीओची स्थापना केली. शासकीय मदत मिळवून देणे, आधार कार्ड बनवून देणे, ज्येष्ठाना ज्येष्ठ नागरिक दाखले, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप करणे, वृद्धांसाठी आधार कट्टा तयार करणे आदी उपक्रम संस्थेने राबवलेले आहेत. वृद्धाश्रम उभारणे हे या संस्थेचे उद्दीष्ट्य आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि उत्कर्षासाठी ही संस्था झटते. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शिंदे यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत प्रकाश गंगाधरे यांनीे व्यक्त केले.
संस्थेच्या जास्तीत जास्त शाखा उभारून त्याद्वारे शेवटच्या माणसांपर्यंत मदत पोहोचवणे हा संस्थेचा उद्देश आहे, अशी संस्थेची भूमिका अध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केली.