प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचं वयाच्या ३५ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झालं. मागील काही महिन्यांपासून आदित्य आजारी होता. मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्याचं निधन झाल्याची माहिती निळत आहे. म्युझिक अरेंजर, निर्माता म्हणून आदित्य यांनी संगीत क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती.
मूत्रपिंडाच्या समस्येवरील उपचारांसाठी आदित्य यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी आदित्यची प्राणज्योत मालवली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नियमांचं पालन करत मुंबईत आदित्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ सिनेमात आदित्य यांनी एक गाणं कम्पोज केलं होतं. 'साहेब तू' या गाण्याला त्यांनी संगीत दिलं होतं.
अनुराधा पौडवाल यांचे पती अरुण पौडवाल हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते. नव्वदच्या दशकात अनुराधा पौडवाल करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांचे पती अरुण यांचं निधन झालं होतं. त्यानंतर मुलाचं झालेलं निधन हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.