मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम परिसरातील आशा पारेख या रुग्णालयाला अखेर टाळं लागलं आहे. व्यवस्थापनातील अडीअडचणींमुळे हे रुग्णालय अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, तशी नोटीस देखील लावण्यात आली आहे.
एवढंच नाही, तर रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील मशीन्स, उपकरणे देखील विकायला काढली आहेत. या विक्रीची जाहिरातही एका वृत्तपत्राला देण्यात आली आहे. शिवाय, याविषयी रुग्णालय प्रशासनाकडून जाणण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हे रुग्णालय विकलं नसून तर ते नवीन व्यवस्थापनाला हस्तांतरीत केल्याचं सांगितलं आहे.
आशा पारेख हे ११० बेडचं रुग्णालय होतं. ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांना व्हायचा. पण, आता हे रुग्णालय बंद झाल्याने इथल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयाचा सहारा घ्यावा लागणार आहे.
तर, येत्या १५ एप्रिल २०१८ पर्यंत रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांचे केसपेपर, मेडिकल फाईल, रिपोर्ट्स घेऊन जाण्याची मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत रुग्णांनी त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स घेतले नाही, तर रुग्णालय प्रशासन यानंतर जबाबदार राहणार नाही, असंही या जाहिरातीत लिहिण्यात आलं आहे. शिवाय, जन्म आणि मृत्यू दाखला घेऊन जाण्याचे आदेशही या जाहिरातीतून देण्यात आले आहेत.