मुंबईचा नवा विकास आराखडा बनवण्यात येत असल्यामुळे विद्यमान आराखड्यातील आरक्षित जमिनींबाबत जमिन मालकांकडून महापालिकेला खरेदी सूचना बजावल्या जात आहेत. दहिसर गाव येथे प्राथमिक शाळा आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडाबाबत अशाचप्रकारे मालकाने खरेदी सूचना बजावून तिवरांची जागा महापालिकेच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण भूखंड हा सीआरझेड एकरमध्ये मोडणारा तिवरांचा परिसर आहे. या तिवरांच्या झाडांचा हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला 31 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, हा भूखंड ताब्यात घेतला तरी त्यावर कोणतेही बांधकाम करता येणार नाही, तरीही 31 कोटी रुपये मोजून ती जागा ताब्यात घेऊन विकासकाला मदत करते की, हा प्रस्तावच नामंजूर करून करदात्यांचे पैसे सुधार समिती वाचवते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आर/उत्तर विभागातील दहिसर गावातील खेळाचे मैदान, महापालिका प्राथमिक शाळा यासाठी आरक्षित असलेल्या 3782.05 चौरस मीटरच्या भूखंडाकरता मेसर्स कार्तिकेय डेव्हलपर्स यांनी खरेदी सूचना बजावली. या भूसंपादनाच्या खर्चापोटी 31कोटी 31 लाख रुपये खरेदी सूचनेसाठी निश्चित करण्यात आली आहे. नव्या विकास आराखडयात हा भूखंड ‘नैसर्गिक जमिनपट्टा’ असे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे विद्यमान तथा जुन्या आरक्षणानुसार महापालिकेला खरेदी सूचना बजावून तिवरांची जागा महापालिकेच्या माथी मारण्याचा विकासकाचा डाव असल्याचे उघड होतं.
हा भूभाग सीआरझेड 1 मध्ये मोडत आहे. तसेच याठिकाणी तिवरांची झाडे अस्तित्वात असल्याने महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार खासगी जमिनीवरील कांदळवनाचे क्षेत्र असलेली जमिन वने म्हणून घोषित करण्यात आली आहे. हा भूखंड ताब्यात घेऊनही आरक्षणानुसार त्याच्या वापरासाठी अर्थात खेळाचे मैदान व प्राथमिक शाळा याच्यासाठी याचा वापर होणार नाही. परिणामी जमिनीच्या बदल्यात मालकाला दिला जाणारा भरपाई मोबदला हा योग्य कारणासाठी खर्च होणार नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट करूनही सुधार समितीच्या अध्यक्षांनी सदस्यांसह या जागेची पाहणी 6 एप्रिल 2017 रोजी केली. यावेळी विकास नियोजन विभागाचे सहाय्यक अभियंता एस.व्ही. आरविकर यांनी ही बाब अध्यक्षांसह सदस्यांच्या लक्षात आणून देत 31 कोटी रुपये खर्च करून हा भूभाग ताब्यात घेऊन मैदान आणि शाळेसाठी त्याचा वापर करता येणार नसल्याचे सांगितले.
मात्र, हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर या आग्रही असून, याठिकाणी मोकळी जागा जास्त असल्यानं भविष्यात तेथे मनुष्यवस्ती होऊ शकते का? हेही पाहावे,अशी सूचना केली. तसेच महापालिकेला मुंबईकरांसाठी मनोरंजन मैदान व खेळाचे मैदान आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी मात्र, याबाबत सर्व सदस्यांच्या भूमिका लक्षात घेऊन सुधार समितीत योग्य निर्णय घेऊ असं सांगितलं.