Advertisement

मुंबईकरांसाठी महापालिकेचा सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म

फेसबुक आणि ट्विटरवर महापालिकेच्या वतीने जनजागृती, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणं, त्यांच्या तक्रारी जाणून घेणं, विश्लेषण करणं, तक्रारी-समस्यांना उत्तरं देणं आदी कामे केली जातील.

मुंबईकरांसाठी महापालिकेचा सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म
SHARES

मुंबईकरांना महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती एका क्लिकवर मिळावी तसंच त्यांच्या तक्रारी तत्काळ सोडवता याव्यात, म्हणून मुंबई महापालिका प्रशासन केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करत आहे. परंतु हा प्लॅटफाॅर्म चालवण्यासाठी इतर संस्थेची नेमणूक करण्यात येत असून त्यासाठी एकूण ६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. महापालिकेचा स्वत:चा माहिती तंत्रज्ञान विभाग असताना, इतर कुठल्याही संस्थेला ६ कोटी देण्याची गरज काय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. मात्र या विरोधाला न जुमानता  सत्ताधारी शिवसेनेने स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला आहे.

काॅमन व्यासपीठ

महापालिकेने स्वत:चं MCGM24X7 मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केलं आहे. या माध्यमातून मुंबईकरांना पाणीपट्टी, मालमत्ता कर, तक्रारी, शौचालय शोधक आणि आपत्ती, इव्हेंट हायलाइट्स आणि संदेश देण्याची सुविधा उपलब्ध आहे. www.portal.mcgm.gov.in या वेबपोर्टलवरून मुंबईकरांना विभाग कार्यालयांचा तपशील, नागरी सेवा-सुविधाही पुरविल्या जातात. या कामात सुसूत्रता आणण्यासाठी एकच काॅमन व्यासपीठ निर्माण करण्याचं महापालिकेने ठरवलं आहे. 

कुठली सेवा मिळेल?

फेसबुक आणि ट्विटरवर महापालिकेच्या वतीने जनजागृती, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणं, त्यांच्या तक्रारी जाणून घेणं, विश्लेषण करणं, तक्रारी-समस्यांना उत्तरं देणं आदी कामे केली जातील. त्यामुळे मुंबईकरांना महापालिकेच्या विभाग कार्यालयांची माहिती, अपडेट आणि कार्यक्रम समजतील. ही टीम आपत्कालीन व्यवस्थापनाच्या टीमसोबत समन्वय साधून आणि नियंत्रणाखाली काम करेल. 

३५ जणांची नियुक्ती

या सोशल मीडिया उपक्रमाचं व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी)कडून ३५ आयटी आॅफिस सहायक आणि सोशल मीडिया तज्ज्ञ अशी मनुष्यबळ सेवा घेण्यात येणार आहे. यासाठी २७ जून २०१९ मध्ये करार करण्यात आला असून यासाठी ५ कोटी ७९ लाख ९४ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आलं आहे. १६ जुलै, २०१९ ते १५ जुलै, २०२२ पर्यंत ही मनुष्यबळाची सेवा घेऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची देखभाल केली जाईल.



हेही वाचा-

मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल होणार स्मार्ट

एसटी बस आहे कुठं? आता लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा