बांद्रा ( bandra) रेक्लेमेशनमधील ए के वैद्य मैदानावर सार्वजनिक स्विमिंग पूल बांधण्याच्या प्रस्तावामुळे स्थानिक रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण या निर्णयामुळे 27 झाडे तोडण्यात येणार आहे.
14 झाडांचे पुनर्रोपण केले जाईल असे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी, रहिवासी नाराज आहेत. कारण महापालिकेचा (bmc) 23 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मैदानाची 30 टक्के जागा स्विमिंग पूलसाठी जाईल.
उपमहापालिका आयुक्त (उद्यान), किशोर गांधी म्हणाले, "माझ्याकडे सविस्तर प्रस्ताव नाही, परंतु आम्ही बांद्रा रेक्लेमेशनच्या (bandra reclamation) जागेवर एक स्विमिंग पूल (swimming pool) बांधत आहोत. जिथे जास्त झाडे तोडली जाणार नाहीत."
बांद्रा रेक्लेमेशन एरिया व्हॉलंटियर्स ऑर्गनायझेशन (ब्राव्हो)च्या विद्या वैद्य यांनी सांगितले की, रहिवाशांना स्विमिंग पूल नको आहे. कारण “नागरिक या मैदानाचा वापर दररोज क्रिकेट, फुटबॉल आणि फिरण्यासाठी करतात. त्यामुळे स्विमिंग पूल बांधल्यास अडथळा निर्माण होईल.”
महापालिका वॉर्ड क्रमांक 97 चे माजी नगरसेवक आणि वांद्रे येथील राजकारणी रहबर खान ज्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली. ते म्हणाले “मी पहिल्यांदा 2009 मध्ये स्विमिंग पूलचा प्रस्ताव दिला होता, पण महापालिकेकडे तेव्हा निधी नव्हता.”
तसेच ते पुढे म्हणाले की, "जेव्हा माझी पत्नी मुमताज 2017 मध्ये नगरसेविका झाली, तेव्हा तिने या कल्पनेचा पाठपुरावा केला." 2 ऑक्टोबर 2023 रोजी महापालिकेला लिहिलेल्या पत्रात, मुमताजने पुन्हा एकदा वांद्रे पश्चिम येथे स्विमिंग पूलच्या प्रस्तावावर भर दिला होता.
रहबर खान म्हणाले की, या प्रस्तावात 40 झाडे तोडावी लागतील. तसेच मी मंगळवारी जागेची पाहणी करेन. प्रत्यक्ष जागेला भेट दिल्यानंतर, आम्ही झाडांचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ”
दरम्यान, काही रहिवाशांनी स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्याकडे याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आशिष शेलार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महापालिकेला या प्रस्तावाचा आढावा घेऊन हा प्रस्ताव मागे घेण्यास आधीच सांगितले असल्याचे सांगितले.
महापालिकेने या वर्षी जुलैमध्ये स्विमिंग पूलच्या बांधकामासाठी 23 कोटी रुपयांची निविदा जाहीर केली होती. खेळाच्या मैदानाच्या 30% जागेवर स्विमिंग पूल बांधला जाईल, तर उर्वरित 70% सार्वजनिक वापरासाठी ठेवण्यात येईल.” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेतर्फे असेही सांगण्यात आले की, खेळाच्या मैदानात पोहण्याची सुविधा आणि मोकळी जागा या दोन्ही बाबी संतुलित करण्यासाठी हे केले जात आहे.
हेही वाचा