2029 पर्यंत मुंबईचे T-1 टर्मिनल बंद राहणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळ हा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.
मुंबई विमानतळाचे T1 टर्मिनल ऑक्टोबर 2025 पासून पुनर्बांधणीच्या कामासाठी बंद केले जाणार आहे. 2029 मध्ये मुंबईचे T-1 टर्मिनल पुन्हा सुरू होईल. पुनर्बांधणीचे काम सुरू असेपर्यंत येथून प्रवास करणाऱ्या दीड कोटी प्रवाशांपैकी एक कोटी प्रवाशांची वाहतूक नवी मुंबई विमानतळावरून केली जाणार आहे.
विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) अध्यक्ष विपिन कुमार, नागरी विमान वाहतूक ब्युरो (बीसीएएस) प्रादेशिक संचालक प्रकाश निकम यांच्यासह नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए), अदानी विमानतळ होल्डिंग्ज (एएएचएल) आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यांचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली. यावेळी नवी मुंबई विमानतळाच्या कामाचे अपडेट या पथकाने घेतले. नवी मुंबई विमानतळाचे काम हे जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.
मुंबई विमानतळावर प्रवाशांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई विमानतळ उभारण्यात येत आहे.
1160 हेक्टर परिसरात उभारण्यात येत आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात.
या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल.
हेही वाचा