नवी मुंबईत (navi mumbai) प्रथमच ‘कोल्डप्ले’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 21 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. जागतिक स्तरावरच्या प्रसिद्ध कलावंतांचा सहभाग या कार्यक्रमात असणार आहे.
मात्र या संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांना संगीत कार्यक्रमातील आवाजामुळे होणारा त्रास लक्षात घेता ही सूचना देण्यात आली आहे.
‘कोल्डप्ले’ (coldplay) हा संगीत कार्यक्रम नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. संगीत क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे.
कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या प्रेक्षकांमुळे नवी मुंबईत हजारो वाहनांची भर या दिवसांत पडणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी स्टेडियमला येणारे कलावंत व महत्त्वाच्या व्यक्ती व प्रेक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासन कंबर कसून नियोजन करत आहे.
यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना ये-जा करण्यास तसेच पार्किंग करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विविध खबरदारी घेत असताना आता या संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर निर्बंध (banned) लावण्यात आले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण विभागाकडून आयोजकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी आवाजाची पातळी 120 डेसिबल पेक्षा अधिक राहणार आहे. व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई असणार आहे. यामुळे लहान मुलांच्या कानाला आणि डोळ्यांना त्रास होईल.
यामुळे लहान मुलांना (childrens) श्रवण संरक्षण ( इयरप्लग ) शिवाय परवानगी देऊ नये अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाकडून आयोजकांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा