गणेशोत्सव हा राज्यातील पारंपरिक उत्सव. या उत्सवादरम्यान गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी होते. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तो शांततेत आणि उत्साहात पार पडावा म्हणून पोलिस विभागाने संवेदनशील राहून सुरक्षेचे उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात राज्यातील सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मुंबईमधील गणेश मूर्तींच्या उंचीसंदर्भात गणेश मंडळांनी आणि समन्वय समितीने जनजागृती करावी, मुंबईतील वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळता यावी, म्हणून स्थापनेसाठी गणेशमूर्ती सुट्टीच्या दिवशीच आणावी, अशा सूचना पोलिसांनी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना द्याव्यात आणि विसर्जनाच्या काळात योग्य त्या उपाय योजना राबवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना यावेळी दिले.
CM @Dev_Fadnavis chaired a meeting of Ganesh Mandal representatives&senior police officials to review preparations for upcoming Ganeshotsav! pic.twitter.com/aMaxpbhAhP
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 7, 2017
पारंपरिक गणेशोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांच्यासह जयेंद्र साळगावकर यांची उपस्थिती होती.
मुंबईत सध्या मेट्रोची कामे सुरू आहेत. यामुळे वाहतूक पोलिस विभागाने गर्दीचे व्यवस्थापन योग्यरीतीने करावे, तसेच मंडळांना लागणारे सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलिस विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
हेही वाचा -
चाकरमान्यांका बाप्पा पावलो, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी