Advertisement

लॉकडाऊनमुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळं हातवर पोट असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

लॉकडाऊनमुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ
SHARES

कोरोनामुळं हातवर पोट असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन सुरू असल्यानं डबेवाल्यांना आपली सेवा देत येत नाही. मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाले आणि मुंबईतील सुमारे दोन ते तीन हजार डबेवाल्यांनी आपली गावं गाठली. त्यांच्या मागे उरलेल्या दोन हजार डबेवाल्यांचे मात्र हाल होत आहेत. लॉकडाउन काही दिवसांतच उठेल आणि रोजीरोटी पुन्हा सुरू होईल, अशा आशेवर काही डबेवाले गावी गेले. मात्र लॉकडाउन वाढत चालल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

कोरोनामुळे जगभरात सर्वच प्रकारचे लहानमोठे उद्योग, व्यवसाय मान टाकत असल्याच्या बातम्या कानावर पडत असल्यानं गावी आणि मुंबईत असलेल्या दोन्हीकडच्या डबेवाल्यांना आपला रोजगार पुढच्या काळात पुन्हा सुरळीत होईल, की नाही याची चिंता आता सतावू लागली आहे. ब्रिटिशांच्या काळापासून तब्बल १३० वर्षे ज्यांनी मुंबईच्या चाकरमान्यांच्या पोटाची काळजी घेतली; उन, थंडी, वारा, पाऊस अथवा परिस्थिती कितीही बिकट असो त्याची तमा न बाळगता ज्याने आपली सेवा मुंबईकरांना दिली आहे. मात्र आता त्यांनाचीच हा कोरोना उपासमार करतो आहे.

मुंबईतील ९० टक्के डबेवाले कामगार मुळचे पुणे जिल्ह्यातील मावळ, जुन्नर, मुळाशी, खेड, राजगुरु नगर भागातील तर दहा टक्के नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील आहेत. जवळपास सगळेच डबेवाले मुंबईत दाटीवाटीच्या झोपडपट्टीत राहातात. लॉकडाउनमुळे सुरक्षित वावर पाळण्याची आवश्यकता असली तरी दहा बाय दहाच्या घरात त्यांची फारच गैरसोय होत आहे. त्याशिवाय, अनेक डबेवाल्यांचे रेशनकार्ड हे गावी आहे. त्यामुळं त्यांना रेशनचे धान्य गावी मिळत होते. लॉकडाउनमुळे ते धान्य मुंबईला आणू शकत नाहीत. 

मुंबईत रेशनकार्ड नाही म्हणून येथे रेशन मिळत नाही. तर डबेवाल्यांनी खायचे काय, असा सवाल डबेवाला संघटनेने केला आहे. 'आमची सरकारला विनंती आहे, की या संकट काळात रेशनकार्ड पाहू नका. रेशनकार्ड असो वा नसो सरसकट गरजवंत कुटुंबाला सरकारी अन्नधान्याची मदत करावी. सरकारने असा निर्णय घेतला, तरच मुंबईत रेशनकार्ड नसलेल्या डबेवाल्यांना अन्नधान्य मिळू शकते व लॉकडाउनमध्ये त्यांची गुजराण होऊ शकते', असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा