लॉकडाऊनमुळं मागील आडीच महिना बंद असलेली मुंबई हळुहळू सुरू होत आहे. २ महिन्यानंतर कार्यालयाची वाट धरलेल्या प्रवाशांना पहिल्याच दिवशी पेट्रोल पंपावरील रांगांचा सामना करावा लागला. त्यातच टायरमध्ये हवा भरणं, इंजिन ऑइल बदलणं या कामांमुळं पंपावरील गॅरेज चालकांकडे देखील गर्दी पाहायला मिळाली.
पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांकडून डिजिटल पेमेंटवर मोठ्या प्रमाणात भर होता. पेटीएम, गुगल पे, फोन पे, डेबिट-क्रेडीट कार्ड असे विविध पर्याय उपलब्ध असल्याने कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा झाला. मात्र तरिही वाहनाची संख्या जास्त असल्यानं पंपावर लांबच लांब रांगा होत्या. सार्वजनिक वाहतूक मर्यादित स्वरूपात सुरू राहणार असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी स्वत:चे वाहन असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेतलं आहे.
गॅरेजवर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेले २ महिने आर्थिक संकटाचा सामना केला परंतु, २ महिन्यांनंतर एकाच दिवशी अनेक ग्राहक आल्यानं कमाईची चिंता भेडसावणाऱ्या गॅरेजवरील कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. अनेक पेट्रोल पंपावर सुरक्षित वावराच्या नियमांचं पालन करण्यासाठी पेट्रोल पंप चालकांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
महिलांसह दुचाकी-चारचाकींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी इंधर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क आणि हातमोजे घालून कर्मचारी इंधन भरत होते. सोमवारी वाहन घेऊन कार्यालयात जायचे असल्याने रविवारी दिवसभर गाडीची बॅटरी चार्ज करण्यासाठी गॅरेजांवर झुंबड उडाली होती. दुचाकीच्या बॅटरीसाठी एरव्ही ४०-५० रुपये घेणाऱ्या गॅरेजचालकांकडून ७०-८० रुपयांची मागणी करण्यात येत होती. तसंच चारचाकी वाहनांच्या बॅटरी चार्जिंगसाठी १५० ते १७० रुपये असा दर होता.
हेही वाचा -
राज्यात २५५३ नवीन रुग्णांची नोंद, तर दिवसभरात १०९ जणांच्या मृत्यूची नोंद
कोरोनाने मृत्यू झाल्यास मुंबई महापालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई