तृतीयपंथींना समाजात मिळणाऱ्या हिन वागणुकीमुळे त्यांना सन्मानाने जगता येत नाही. त्यामुळे या समाजातील लोक भिक मागून उदरनिर्वाह करत आहेत. याकरता महापालिका ज्याप्रमाणे निराधार महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते, त्याप्रमाणे या तृतीयपंथी समाजातील लोकांनाही महापालिकेने उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा नगरसेविकेने केली आहे. यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
गरीब, गरजू, विधवा या निराधार महिलांना उपजिविकेसाठी घरघंटी, शिलाई मशिन तसेच इतर काही वस्तू जेंडर बजेट अंतर्गत उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच धर्तीवर तृतीयपंथी लोकांच्या उपजिविकेसाठी एक विशेष निधी उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणीन रिटा मकवाना यांनी महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समाजात तृतीयपंथी लोकांना कमी लेखलं जातं. या समाजातील लोकांना सामान्य नागरिकांप्रमाणे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारच्यावतीने सुरू आहे. तृतीयपंथीयांना मतदानाचा अधिकार सरकारने प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे ते निवडणुकीत मतदानही करू शकतात आणि निवडणुकीत उभेही राहू शकतात. परंतु, हे अधिकार मिळूनही या तृतीयपंथीयांना समाजात मानाने जगता येत नाही. त्यामुळे ते एक तर भिक मागून किंवा वेशा व्यवसाय करून आपली उपजिविका करत असतात.
या समाजातील लोकांना आर्थिकरित्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अशाप्रकारे विशेष निधी उपलब्ध करून दिल्यास त्यांना उपजिविकेसाठी भिक मागावी लागणार नाही. शिवाय त्यांना मानाने जगता येईल.
- रिटा मकवाना, नगरसेविका, भाजपा