जुलै महिन्यात कोसळणाऱ्या पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यांत चांगलीच वाढ झाली आहे. मुंबईकरांना पुढील 241 दिवस म्हणजेच मार्च 2025 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध झाला आहे.
संपूर्ण स्थितीचा आढावा लक्षात घेता, मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली 10 टक्के पाणीकपात सोमवारपासून म्हणजेच 29 जुलै 2024 पासून मागे घेण्यात येत आहे, असे ट्विट पालिकेने केले आहे.
तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपात देखील सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.
जलाशयातील पाणीसाठा कमी असल्याने पालिकेने काही महिन्यांपूर्वी 10 टक्के पाणीकपात जाहीर केली होती. जवळपास 5 टक्के पाणी पाणीसाठा त्यावेळी शिल्लक होता. पण आता मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी विहार धरण गुरुवारी मध्यरात्री 3.50 वाजेच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागले. आतापर्यंत सातपैकी तुळशी, तानसा आणि आता विहार धरण ओसंडून वाहू लागले आहे. सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आजघडीला पाणीसाठा 66.77 टक्क्यांवर पोहोचला आहे.
उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा गुरुवारी पहाटे 66.77 टक्क्यांवर पोहोचला. मुंबईच्या हद्दीत असलेला विहार तलाव गुरुवारी मध्यरात्री 3.50 च्या सुमारास भरून वाहून लागला. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता 2,769.8 कोटी लीटर (27,698 दशलक्ष लीटर) एवढी आहे. मोडक सागर धरणही 98 टक्के भरले आहे.
सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत 9 लाख 66 हजार 395 दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. सात धरणांपैकी तुळशी, तानसा आणि विहार कठोकाठ भरले आहेत. तर सर्वात मोठे भातसा धरण 64 टक्के भरले आहे.