छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पालघर जिल्ह्यामध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याने विकासाच्या नवीन पर्वाला सुरूवात झाली आहे, असं मत कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केलं.
पालघर जिल्ह्यातील विकासकामांसंदर्भात माहिती देताना दादाजी भुसे यांनी सांगितलं की, प्रशासकीय इमारतींमध्ये साधारणत: 60 जिल्हास्तरीय कार्यालये स्थापीत होणार आहेत. आज रोजी पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 41 शासकीय कार्यालये स्थापन झाली असून, उर्वरित 23 विभागांची कार्यालये लवकर स्थापन होणे आवश्यक आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आदिवासी विकास भवन, महिलांसाठी ‘One Stop Centre’ यांचेकरीता जागा उपलब्ध करून देवून सदरहू इमारतींचे बांधकाम येत्या 2 वर्षांमध्ये पूर्णकरण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
याचबरोबर मौजे टेंभोडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागास 2 एकर जागा देण्यात आली आहे. मौजे सरावली येथे सुसज्य ग्रामीण रूग्णालय बांधण्याकरिता 1.5 एक्कर जागा प्रदान करण्यात आली आहे. JSW कंपनी CSR निधीमधून यासाठी 25 कोटी निधी उपलब्ध करून देणार आहे. मौजे उमरोळी येथे जिल्हाकारागृहासाठी 25 एकर जागा, ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रास (RSETI) 2 एकर जागा तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयास 5 हेक्टर (12.50 एक्कर) जागा प्रदान करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये “स्त्री रुग्णालय” स्थापन होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 5 एक्कर जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
हेही वाचा- गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिकेची नवीन नियमावली
स्थानिक खेडाळूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी मौजे टेंभोडे येथे 16 एक्कर जागेमध्ये राष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडासंकुल विकसित करण्यात येत आहे. मौजे अल्याळी येथे 4 एक्कर जागा क्रिडांगणाकरिता पालघर नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. मौजे अल्याळी, नवली, टेंभोडे येथील तलाव व पालघर शहरातील गणेश कुंड बगीचा क्षेत्र विकास करण्यासाठी पालघर नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे.
तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात 3 व्यक्ती मृत्यू व 4 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. 14 हजार 350 शेतकऱ्यांचे 6 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर शेती पिके/ फळपिकांचे नुकसान झालेले आहे. 95 घरांचे पूर्णत: तर 14 हजार 312 घरांचे अशंत: पडझड होऊन नुकसान झालेले आहे.
तसेच 53 बोटींचे नुकसान झाले असून, सदर नुकसानीसाठी शासनाकडून विशेष दराने मदत जाहीर करून जिल्ह्याला 51 कोटी 51 लाख इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभारही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केले.