मागील आठवड्याच्या बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परळच्या दामोदर नाट्यगृहाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाट्यगृहातील खुर्च्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळं नाट्यगृहाचे ४५ ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सोशल सर्व्हिस लीगच्या कार्यालयातून देण्यात आली.
मागील ७ महिन्यांपासून नाट्यगृह प्रयोगांसाठी बंद आहेत. त्याचा आर्थिक फटका बसलेला असतानाच आता व्यवस्थापनावर अधिकच भार पडला आहे. नाट्यगृहात तुंबलेल्या पावसाच्या पाण्याने एलईडी प्रकाशयोजना नियंत्रण प्रणाली निकामी केली आहे. सोबतच रंगमंचाचा काही लाकडी भागही पाण्याने फुगला आहे.
आसनाचे इंडिकेटर लाइटही निकामी झाले आहेत. तब्बल ४०० खुर्च्यांचे नुकसान झाले असून, त्या बदलाव्याच लागतील, अशी माहिती कार्यलयातील सचिन बापेरकर यांनी दिली. प्रेक्षागृहात फ्लोअरिंगचा काही भाग देखील तुटला आहे. त्यामुळे त्याचीही डागडुजी आणि रंगकाम करावे लागणार आहे.
प्रेक्षकांसाठी नाट्यगृह पुन्हा सुसज्ज आणि त्यांच्या सेवेत रुजू करण्यासाठी व दुरुस्तीसाठी आर्थिक पाठबळाची गरज असल्याचे सोशल सर्व्हिस लीगचे अध्यक्ष आनंद माईनकर यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी या नुकसानीचा आढावा घेऊन राज्याचे सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहणार असल्याची माहिती समोर येत आहे.