मुंबई – महापालिका क्षेत्रातील बहुमजली झोपड्या पाडण्याच्या कारवाईला शनिवारपासून वांद्र्यातील बेहरामपाडा येथून सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र ही कारवाई सुरू होण्याआधीच यावरून राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. या निवडणुकीत 227 पैकी 90 जागांवर झोपडपट्टीवासीयांचे मतदान निर्णायक ठरत असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. तर या झोपडपट्टयातील मतदार विशेषत कांग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आहे. त्यामुळे कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने या कारवाईला सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. बेहरामपाड्यातील दुर्घटनेनंतरही या पक्षांची भूमिका बदलली नसल्याचे पालिकेतील सूत्रांकडून समजते आहे. तर शिवसेनेने सावध भूमिका घेतली असून, या कारवाईबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पण या कारवाईमुळे कॉग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या व्होटबँकेला धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे ही कारवाई सुरू झाल्यानंतर यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे झोपड्यांमध्ये भाजपचा मतदार नसल्याने भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची व्होटबँक फोडण्यासाठी ही खेळी खेळल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.