मुंबईत अनधिकृत बांधकाम करणं आता महागात पडणार आहे. मुंबईतील अतिक्रमणांवर उपग्रहामार्फत पालिका नजर ठेवणार आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामाची माहिती पालिकेला तात्काळ मिळणार आहे. त्यानंतर काही वेळातच हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात येणार आहे.
मुंबईत मोकळा भूखंड दिसला की भूमाफिया जागा बळकावत बेकायदा बांधकाम उभारतात. त्यामुळे पालिका बेकायदा बांधकामांवर आळा घालण्यासाठी उपग्रहावरुन नजर ठेवणार आहे. अतिक्रमण होत असल्याची तक्रार आल्यास त्या भागातील सध्याची आणि पूर्वीची उपग्रहीय छायाचित्र यांची तुलना करून अतिक्रमण ओळखता येणार आहे.
अतिक्रमण निर्मुलन मागोवा प्रणाली विकसीत करण्यासाठी महानगर पालिकेने निविदाही मागवल्या आहेत. यासाठी १० कोटी २८ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मंजूऱ्या घेऊन प्रत्यक्ष ही यंत्रणा उभारण्यास सुरूवात होणार आहे. मुंबईतील इमारतींचे, झोपड्यांचे तसंच इतर सर्व प्रकारच्या बांधकामांचे व्दीमितीय चित्रीकरण उपग्रहांच्या मदतीने तयार होणार आहे. त्यामुळे लहान मोठे बदलही उपग्रहांच्या माध्यमातून लागलीच लक्षात येतील. जीआयएस पध्दतीमुळे अतिक्रमण,बेकायदा बांधकाम होत असलेले ठिकाण अचूक समजू शकेल.
विशिष्ट तंत्रज्ञान वापरून मुंबईतील इमारतींचे ३६० अंशात महानगर पालिकेने सर्वेक्षण केले आहे. यातून इमारतींमध्ये तब्बल तीन लाखाच्या आसपास बेकायदा बदल पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून दंड वसुल करणे, वापराच्या प्रकारानुसार मालमत्ता कर वसुल करणे अशी कार्यवाही महापालिका करणार आहे.
हेही वाचा -