मुंबईतील शालेय मुलांना पौष्टीक आहार देण्यात येतो तसा घनकचरा विभागातील सफाई कामगारांनाही देण्याची मागणी होत आहे. मुंबईची स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांना घाण तसेच दुर्गंधीचा सामना करत काम करावे लागते. त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सफाई कामगारांच्या आरोग्याचा विचार करता त्यांना पौष्टीक आहार देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय भाषणात मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी ही मागणी केली. मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून महापालिकेचा सफाई कामगार स्वत: घाणीत
उतरून स्वच्छतेचे काम करतो. त्यात रस्त्यांची साफसफाई, कचरा कुंडीतील कचरा उचलणे, गटारी, मल:निस्सारण टाक्यांची सफाई अशा कामांचा समावेश आहे.
असे काम वर्षानुवर्षे करताना सफाई कामगारांना अनेक आजार जडतात. बहुतांश सफाई कामगार मद्यपानाच्या आहारी गेल्याने त्यांचे शरीरस्वाथ्य बिघडते. सफाई कामगारांना प्रशासनाकडून म्हणाव्या तशा प्रमाणात सुविधा मिळत नाहीत.
कामगारांना देण्यात येणारे गणवेश, बूट, हातमोजे, कचरा भरण्यासाठी लागणारे साहित्यही निकृष्ट दर्जाचे असते. या कामगारांवर देखरेख ठेवणारे मुकादम, अवेक्षक, सहायक पर्यवेक्षक, पर्यवेक्षक सहायक अभियंता यांना त्याची कल्पना असूनही ते कामगारांची दयनीय अवस्था पाहत राहतात.
या सर्व कारणांमुळे सफाई कर्मचाऱ्याचे आयुर्मान हे ४५ ते ५० एवढेच झाले आहे. तरीही प्रशासन सफाई कामगारांच्या हिताचा विचार करताना दिसत नाही. त्यामुळे कामगारांचे आयुर्मान वाढवण्यासाठी सफाई कामगारांना पौष्टीक आहार देण्यात यावा, अशी मागणी लांडे यांनी केली.
या सफाई कामगारांना चांगले निवासस्थान, पौष्टीक आहार त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचे संरक्ष देण्याची गरज आहे, तसे न केल्यास भविष्यात सफाई कामगार मिळणे मुश्कील होईल, अशी भीतीही लांडे यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)