महापालिकेच्या प्रत्येक आर्थिक खर्चाच्या विकास प्रस्तावांना स्थायी समितीची मान्यता दिली जाते. परंतु, स्थायी समिती म्हणजे अंडरस्टॅण्डिंग असे म्हटले जाते, हे पुन्हा एकदा दिसून आले असून गोराई डम्पिंग ग्राऊंडचा राखून ठेवलेला प्रस्ताव चक्क 'कागदोपत्री मंजूर' असा दाखवण्याची किमया स्थायी समितीने साधली आहे. स्थायी समितीने काळ्या यादीतील या कंत्राटदाराचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 'या बोटावरची त्या बोटावर' केल्याची चर्चा सध्या महापालिकेत ऐकायला मिळत आहे.
गोराई कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने कविराज एमबीबी या कंपनीला दोन वर्षांसाठी कंत्राट देण्यात दिले होते. परंतु, या कंपनीचा भागधारक तथा संचालक हे काळ्या यादीतील कविराज तथा विश्वशक्ती या कंपनीतील असल्याने सर्वच पक्षांच्या सदस्यांनी याला तीव्र विरोध करून हा प्रस्ताव दप्तरी दाखल करत प्रशासनाकडे परत पाठवला होता.
परंतु, फेब्रुवारी महिन्यात हा प्रस्ताव विधी विभागाचा अभिप्राय घेऊन पुन्हा स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला. गोराई कचरा हस्तांतरण केंद्राचा प्रस्ताव काळ्या यादीतील कंत्राटदार म्हणून फेटाळला होता. परंतु काळ्या यादीतील कविराज इन्फ्राटेक व कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीशी काहीही बंधन नसल्याचा कायदेशीर अभिप्रायासह सादर केला होता. परंतु महापालिका अधिकाऱ्यांच्या जिमखान्याच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाल्यानंतर दोनदा मतदान घेऊन तो मंजूर केला. त्यामुळे याचा निषेध म्हणून भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या सभात्यागानंतर विषय क्रमांक ३३ सह पुढील कचऱ्याचे विषय क्रमांक ३४ ते ३७ हे सर्व प्रस्ताव राखून ठेवण्याचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी पुकारले.
महापालिका चिटणीस तसेच घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नोंदीवर गोराईचे हे प्रस्ताव राखून ठेवल्याची अर्थात 'नॉट टेकन' केल्याची नोंद आहे. परंतु, हा प्रस्ताव राखून ठेवलेला असताना प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींनी हा प्रस्ताव मंजूर केल्याचे आणि मोठ्या इंग्रजी दैनिकांमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे वृत्त छापून आले. याचाच फायदा उठवून सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे दाखवण्यासाठी चिटणीस विभागावर दबाव आणून निर्णयात कागदोपत्री फेरफार करण्यास सांगितले. त्यानुसार अध्यक्ष आणि सर्व गटनेत्यांच्या मान्यतेने हा राखून ठेवलेला प्रस्ताव मंजूर झाल्याची नोंद केली गेल्याची चर्चा सध्या महापालिकेत ऐकायला मिळत आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अधिकाऱ्यांसाठीच्या जिमखान्याच्या प्रस्तावावरील मतदान विरोधात गेल्यानंतर अध्यक्षांनी फेरमतदान घेऊन तो प्रस्ताव मंजूर केला. परंतु, त्याच बैठकीत हा प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही तो मंजूर दर्शवला गेला. त्यामुळे एका आठवड्यात अणि एकाच बैठकीत दोन ऐतिहासिक निर्णय घेतल्याने अध्यक्षांची नोंद सुवर्णाक्षरात होणार असून गोराईतील हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठीच भाजपाने सभात्याग केला असल्याचीही चर्चा महापालिकेत ऐकायला मिळत आहे. भाजपा हा पक्ष महापालिकेतील पहारेकरी असतानाही त्यांच्या डोळ्यांदेखत गोराईतील हा प्रस्ताव मंजूर म्हणून दाखवल्यानंतरही त्यांच्याकडून पुढील बैठकीत कोणताही प्रश्न उपस्थित केला जात नसल्याने ही शंका आता अधिक बळावली आहे.
हेही वाचा
ग्लोबल वेस्टनंतर समय परिवहन कंपनीही होणार कचरा कंत्राटात बाद?