क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास विभागांतर्गत हा कक्ष सुरू केला जाणार असल्याचं कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.
विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन करणे असे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
नवाब मलिक म्हणाले की, राज्यात सध्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.
महिला उद्योजकता कक्षामार्फत महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नॅसकॉम, सीआयआय, फिक्की, असोचॅम आदी विविध नामांकीत संस्थांसमवेत भागीदारी करण्यात येईल. महिला बचतगट, महिला उद्योजक यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल.
या उपक्रमांतर्गत महिलांना स्वव्यवस्थापन, आर्थिक व डिजीटल साक्षरता, व्यवसाय नियोजन व विकास आदी प्रशिक्षणे देण्यात येतील. याशिवाय महिला उद्योजकांसाठी नवीन इनक्यूबेटर्स स्थापित करणे, विद्यमान इनक्युबेटर्समार्फत महिला उद्योजकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे, मार्गदर्शन करणे यावर हा कक्ष लक्ष केंद्रीत करेल.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी
मध्य रेल्वेच्या स्थानकांत फेब्रुवारीपासून ई-बाईक