9 डिसेंबर 2024 रोजी बसवरील नियंत्रण सुटल्याने नऊ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच 37 जण जखमी झाले होते.
54 वर्षीय मोरे यांची दृष्टी कमी आणि उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले. ज्यामुळे त्यांना बस चालवण्यास अपात्र ठरवता आले असते.
7 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदार आणि उपकंत्राटदार यांची नावे देखील आहेत. तसेच त्यांना निष्काळजीपणासाठी जबाबदार धरण्यात आले आहे.
रात्री 10.30 च्या सुमारास ही दुःखद घटना (bus accident) घडली. कुर्ला ते अंधेरी (andheri) मार्गावर धावणारी 332 क्रमांकाच्या बसचे चालक मोरे याचे बसवरील नियंत्रण सुटले. ती बस 100 मीटरच्या अंतरावर पादचाऱ्यांना आणि वाहनांना चिरडून इमारतीच्या भिंतीवर आदळली. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली मोरे यांना घटनास्थळी अटक करण्यात आली.
1,047 पानांच्या आरोपपत्रात मोरे यांना मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. तर एव्ही ट्रान्स (मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड आणि मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना सह-आरोपी म्हणून सूचीबद्ध केले आहे.
तपासा दरम्यान असे आढळून आले की, 1 डिसेंबर रोजी मोरे याला कामावर ठेवणाऱ्या मोरया ट्रान्सने मोरे याची वैद्यकीय फिटनेस चाचणी घेतली नव्हती, असे मिड-डेने वृत्त दिले आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या तपासणीत असे दिसून आले की मोरे याला लांब आणि कमी अंतराच्या दोन्ही प्रकारचा दृष्टीदोष होता आणि त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता.”
याव्यतिरिक्त, मोरे यांना इलेक्ट्रिक, ऑटोमॅटिक बसेस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील बहुतेक काळ मॅन्युअल बसेस चालवल्या होत्या.
“करारानुसार ड्रायव्हरला समान श्रेणीच्या वाहनाचा पूर्व अनुभव असणे आवश्यक होते, परंतु मोरे यांनी कबूल केले की त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले नाही,” असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले
सुरुवातीला पोलिसांनी कंत्राटदारांची चौकशी केली नाही. परंतु दोन महिन्यानंतर त्यांनी मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ रामानंद सूर्यवंशी आणि एव्हे ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रमेश कटीगंडला यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी मोरे, सूर्यवंशी आणि कटीगंडला यांच्यावर कलम 105 (खून न करता सदोष मनुष्यवध), 110 (सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न), 118 (स्वेच्छेने दुखापत करणे), 3 (सामान्य हेतू) आणि बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.