राज्याच्या कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. कॅराव्हॅन पर्यटन धोरणाचा मसुदा पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत सूचना व हरकती diot@maharashtratourism.gov.in व asdtourism.est-mh@gov.in या ईमेल आयडीवर ३ ऑक्टोबर २०२० पर्यंत पाठविण्यात याव्यात, असं आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. (maharashtra government introduced proposed mtdc caravan tourism policy for suggestions and objections)
महाराष्ट्राला वैविध्यपूर्ण सौंदर्य लाभलं आहे. निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, पर्वतरांगा, थंड हवेची ठिकाणे, नदी, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी, धरणे अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनाची ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी कॅराव्हॅन पर्यटनाकरीता मोठा वाव आहे. तसंच अतिदुर्गम भागात हॉटेल, रिसॉर्टसारख्या राहण्याच्या सोयी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या क्षेत्रामध्ये कायमस्वरुपी बांधकामासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देता येतील.
हेही वाचा - ‘एलिफंटा’चा विकास आराखडा तातडीने सादर करा, पर्यटन राज्यमंत्र्यांच्या सूचना
शिवाय जिथं सध्या पक्के बांधकाम असलेल्या निवास व्यवस्था उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी कॅराव्हॅन पर्यटन करता येईल. या अनुषंगाने कॅराव्हॅन पर्यटन धोरण तयार करण्यात आलं आहे. याबाबत सूचना व हरकती पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
कॅराव्हॅन याला थोडक्यात चालतं-फिरतं घर..म्हणता येईल. मोटारीच्या मागे कॅराव्हॅन जोडून पर्यटनाला जाण्याचा हा प्रकार विदेशात लोकप्रिय आहे.
अलीकडच्या काळात इको, अॅडव्हेंचर, वाइल्डलाइफ, पिलिग्राम टुरिझमला चांगली पसंती मिळू लागली आहे. यामध्ये बर्याचदा दुर्गम भाग, जंगल, सागरी किनार्यावर पर्यटकांबरोबरच छायाचित्रकार, अभ्यासकांना राहावं लागते. या ठिकाणी कायमस्वरूपी बांधकाम करणं शक्य नसतं. परिणामी, त्यांना हॉटेलमध्ये राहावं लागतं. अशा समुद्रिकनारे, गडकिल्ल्यांसारख्या पर्यटनाच्या ठिकाणी ‘कॅराव्हॅन’मध्ये राहण्याचा अनोखा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.