मुंबई - मेट्रो - 3 च्या कामाच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे. रात्री-अपरात्री मेट्रोचे काम सुरू असते त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशी तक्रार मरोळ, कफ परेड या भागातले रहिवासी करत होते. पण मेट्रो प्रशासन त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. यासंदर्भात मुंबई लाइव्हने पुढाकार घेत रहिवाशांच्या समस्या मांडल्या होत्या. मुंबई लाइव्हच्या या बातमीनंतर अखेर रहिवाशांच्या समस्येची दखल घेतली गेलीय. त्यानुसार ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना त्वरीत करण्यासंबंधीचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आलेत, अशी माहिती एमएमआरसीचे कार्यकारी व्यवस्थापक आर. रमण्णा यांनी दिली आहे.
एमएमआरसीच्या आदेशानुसार कंत्राटदारांकडून साऊंड प्रूफ विन्डो आणि नॉईज बॅरिअर लावण्यात येणार असल्याची माहिती मरोळ गावठाणचे रहिवासी अॅडव्होकेट गाॅडफ्रे पेमेन्टा यांनी दिली आहे. साऊंड प्रूफ विन्डोने आवाज कमी होण्यास मदत होते का याची चाचपणी करण्यासाठी पाली मैदानाजवळच्या एका घराला साऊंड प्रूफ विन्डो लावण्यात येणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ज्या ज्या रहिवाशांना त्रास होतो त्यांना साऊंड प्रूफ विन्डो लावून देण्यात येणार असल्याचेही समजते आहे. पण "ही योजना अयशस्वी झाली तर रात्रीच्या वेळेस एमएमआरसीला काम करू दिले जाणार नाही," ही भूमिका कायम असल्याचे पेमेन्टा यांनी स्पष्ट केले आहे.
मरोळ आणि कफ परेडमधील रहिवाशांनी आवाजामुळे मेट्रोच्या कामाला विरोध केला आहे. या संदर्भातील मुंबई लाइव्हचा स्पेशल रिपोर्ट:
https://www.mumbailive.com/mr/city/after-marol-cuffe-parade-residents-on-warpath-against-metro-project-7981