बृहन्मुंबई महानगरपालिकेने (bmc) नागरिकांमध्ये रेबीज (rabies) लसीकरण आणि प्रतिबंध यासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जागरूकता संदेश देणारे व्हिडिओ टेप असलेले एक एलईडी वाहन तयार करण्यात आले आहे.
या वाहनाद्वारे संपूर्ण मुंबईत (mumbai) जनजागृती केली जाईल. तसेच महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा पालिकेचा मानस आहे.
प्राण्यांपासून नागरिकांमध्ये रेबीजचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर जागरूकता उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रेबीजमुक्त मुंबईचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने जनजागृती हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पालिकेच्या वतीने 'मिशन रेबीज' या संस्थेच्या सहकार्याने मुंबईत भटक्या कुत्र्यांना लसीकरण करण्यासाठी 28 सप्टेंबर 2024 पासून सामूहिक लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
हा कार्यक्रम मार्च 2025 पर्यंत सुरू राहील. पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी माहिती दिली की, महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या प्राणीप्रेमी संघटनांच्या मदतीने आतापर्यंत 25 हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एलईडी (LED) स्क्रीनवर आधारित वाहन तयार करण्यात आले आहे. यामध्ये रेबीजचे धोके, लसीकरणाचे (vaccination) महत्त्व, रेबीज प्रतिबंधाच्या उपायांमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे या गोष्टींचा समावेश असेल.
हेही वाचा