कांदिवली येथे अपडेटेड अग्निशमन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
आग लागलेल्या ठिकाणी तात्काळ पोहोचून आग शमवणे, बचावकार्य करणे यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आग शमवणे आणि स्वःरक्षणासाठी जवानांना आधुनिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी कांदिवली येथे जवानांसाठी देशातील पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त अमित सैनी यांनी दिली.
अग्निशमन केंद्राच्या प्रशासकीय कामासाठी तीन मजली इमारत बांधली जाणार आहे. एक लाख स्क्वेअर फूट जागेत या अग्निशमन केंद्राचे काम होणार आहे. या ठिकाणी जवानांना ट्रेनिंग देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
ट्रेनिंग सेंटर, बचाव यंत्रणा, कर्मचारी-अधिकारी निवासस्थान, जवानांसाठी अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटर, बचाव यंत्रणा आणि कर्मचारी-अधिकाऱयांसाठी सर्व सुविधायुक्त निवासस्थान असलेले अद्ययावत अग्निशमन केंद्र कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेज येथे होणार आहे.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक म्हणाले की, मुंबईत निर्माण होणार्या उंच इमारती, दाटीवाटीच्या वसाहतींमधील अरुंद रस्ते, वाढती लोकसंख्या आणि इतर आव्हानांना तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान सदैव कार्यरत असतात. आग शमवण्याच्या घटनांसह जोरदार पावसामुळे सखल परिसरांमध्ये पूरस्थिती, इमारती कोसळणे आणि तत्सम आपत्तींमध्ये बचाव कार्य करण्यासाठी देखील अग्निशमन जवानांना वैविध्यपूर्ण प्रशिक्षण दिले पाहिजे, असे वारिक यांनी नमूद केले.
उप आयुक्त प्रशांत गायकवाड म्हणाले की, आग लागलेल्या ठिकाणी तात्काळ पोहोचून आग विझवण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा मुंबई अग्निशमन दलात समावेश करण्यावर भर देण्यात येत आहे. या अत्याधुनिक यंत्रणेसह अग्निशमन दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ते पुढे म्हणाले, अद्ययावत प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून कांदिवली येथे उभारण्यात येणारे अग्निशमन प्रशिक्षण केंद्र हे देशातील पहिले अद्यावत प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे. या केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही देखील गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा