मुंबई (mumbai) ते नागपूर (nagpur) समृद्धी महामार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र (maharashtra) राज्य रस्ते विकास महामंडळाने (msrdc) समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये (toll) 19 टक्क्यांची वाढ केली आहे.
ही वाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे सध्या नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना, चारचाकी वाहनांना 1080 रुपये टोल मोजावा लागतो तेथे आता 1 एप्रिलपासून 1290 रुपये टोलसाठी खर्चावे लागणार आहेत.
एमएसआरडीसीकडून मुंबई ते नागपूर प्रवास केवळ आठ तासात करता यावा यासाठी 701 किमीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. त्यातील नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा महामार्ग सध्या सेवेत दाखल असून इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा येत्या काही दिवसात वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.
हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते नागपूर अंतर आठ तासात पार करता येणार आहे. मात्र या अतिजलद प्रवासासाठी वाहनचालक तसेच प्रवाशांना टोल मोजावा लागतो. त्यात आता आणखी वाढ झाल्याने प्रवासी आणि वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
एमएसआरडीसीने पथकरात 19 टक्क्यांची वाढ केली आहे. ती 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यानुसार आता चारचाकी, हलक्या वाहनांना प्रति किमी 2.06 रुपये, मिनी ट्रक, बससाठी प्रति किमी 3.32 रुपये, अवजड वाहनांसाठी प्रति किमी 10.93 रुपये तर अतिजड वाहनांसाठी 13.30 रुपये प्रति किमी असे टोलचे दर आकारण्यात येणार आहेत.
टोलच्या दरवाढीनुसार नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना 1080 रुपयांऐवजी 1290 रुपये तर हलक्या व्यवासायिक, मिनी बससाठी 1745 रुपयांऐवजी 2075 रुपये टोल भरावा लागेल.
बस, दोन आसनांच्या ट्रकसाठी 3655 रुपयांऐवजी 4355 रुपये आणि तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी 3990 रुपयांऐवजी 4750 रुपये टोल भरावा लागेल.
अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी 5740 रुपयांऐवजी आता 6830 रुपये तर अतिअवजड वाहनांनासाठी 6980 रुपयांऐवजी 8315 रुपये टोल भरावा लागेल. हे दर 31 मार्च 2028 पर्यंत लागू असतील.
समृद्धी महामार्गातील (samruddhi expressway) शेवटचा इगतपुरी ते आमणे टप्पा पूर्ण झाला आहे. आता केवळ लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. या टप्प्याचे लोकार्पण झाले की मुंबईकरांचे मुंबई ते नागपूर अंतर केवळ आठ तासात पार करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र यासाठी चारचाकी वाहनांना 1445 रुपये इतका टोल मोजावा लागणार आहे.
हेही वाचा