मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा २६ जुलैच्या आठवणींना उजाळा दिला. मुसळधार कोसळलेल्या पावसाने संपूर्ण मुंबईच जलमय करून रेल्वेसह रस्ते वाहतूकच विस्कळीत झाली होती. अवघी मुंबापुरी पाण्याखाली जावून जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर २६ जुलैसारखी वाईट अनुभव मुंबईकरांना आला नाही, मात्र त्रासाला सामोरे जावे लागले. सर्व नाल्यांचे रुंदीकरण करण्यात आले, तसेच सहा ठिकाणी पंपिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली. सुमारे ३०० ठिकाणी पंप बसवण्यात आले तरीही २६ जुलैप्रमाणे पाणी तुंबून मुंबई जलमय झाली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा पैसा पाण्यातच गेला असल्याचे या पावसाने सिद्ध झाले आहे.
मुंबईत २००५ मध्ये २६ जुलैला महाप्रलंय येवून महापूर आल्यानंतर अनेक लोकांचा जीव गमावावे लागले. एकाच दिवशी ९४४ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली होती. यामध्ये १०९४ लोकांचे जीव गेले होते. शेकडो शेकडो जनावरे बुडून मेली गेली. तब्बल दोन दिवस तुंबलेल्या या पावसामुळे ५४ लोकलचे नुकसान झाले होते, ३७ हजार रिक्षा,व ४ हजार टॅक्सी आणि ९०० बेस्ट बसेसचे मोठे नुकसान झाले होते.एवढेच नाही तर १० हजार ट्रक आणि टेम्पोंचेही मोठे नुकसान झाले होते.
मात्र, या २६ जुलैच्या महापुरानंतर मुंबईत नाल्यांचे रुंदीकरण करण्यासाठी तसेच पाण्याचा योग्यप्रकारे निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली. आतापर्यंत पहिल्या टप्यात २० कामे तर दुसऱ्या टप्प्यात ३८ कामे हाती घेण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे ९३ टक्के तर दुसऱ्या टप्प्यातील कामे ही ७५ टक्के एवढी पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
याशिवाय हाजी अली, इर्ला नाला, क्लिव्ह लँड बंदर, लव्ह ग्रोव्ह आणि ब्रिटानिया आऊटफॉल येथे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी सुमारे ५०० कोटी रुपये केले. या ५ पंपिंग स्टेशनसह गझदरबंद पंपिंग स्टेशनही सुरु करण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण मुंबईत ३१० पंपिंग स्टेशन सुरु करण्यात आले. पंपिंग स्टेशनची संख्या वाढत असताना पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या पंपांची संख्या २६६ वरून ३१०एवढी वाढवण्यात आली आहे. तरीही मुंबईत २६ जुलैच्या तुलनेत ३० टक्के एवढाचा पाऊस पडला तरीही मुंबई पाण्याखाली जावून पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणि बिगर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाकरता हजारो रुपये खर्च करूनही मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही.
मुंबईत दिवसभरात मुंबईत सरासरी २०० मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आणि या एवढ्याशा पावसातही मुंबईला डुबवून टाकण्यात आले. मुंबईतील दहिसर, वाकोला, पोयसर, मिठी नदींचे रुंदीकरण होऊनही या नद्यांना पूर आल्यामुळे तसेच सर्वच नाले ओसंडून वाहत असल्यामुळे नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२६ जुलैच्या महापुरानंतर मुंबईत आपत्कालिन व्यवस्थापनाचा आराखडा तयार करून २४ विभागांमध्ये आपत्कालिन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले.तसेच यासाठी कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आले. याशिवाय यंदा मुंबईत ५०० ठिकाणी बसवण्यात आलेल्या कॅमेरांच्या मदतीने ठिकठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यावर आपत्कालिन नियंत्रण कक्षातून देखरेख ठेवून त्याप्रमाणे यंत्रणा रावबण्यात आल्यामुळे मुंबईत पाणी तुंबले असले तरी कोणत्याही प्रकारच्या जिवित अथवा मालमत्तेचे नुकसान झालेले पहायला मिळाले नाही. ही यंत्रणा आणि सोशल मिडियाची साथ असल्यामुळे मुंबईत २६ जुलैसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. केवळ या पुरसदृश्य परिस्थितीमुळे मुंबईकरांना २६ जुलैची आठवण ताजी करून दिली,असे जाणकारांचे म्हणणे आहे.