यंदा भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्तानं मुंबईत नायलॉनच्या पेपरचे छोटे तिरंगी झेंडे, बिल्ले, स्टीकर्स, स्टँड फ्लॅग, कॅप, बँड, तोरण, बलून, तिरंगी दुपट्टे, तिरंगी रंगाचे टि-शर्ट यांसारख्या विविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. या वस्तूंची किंमत १० रुपयापासून अगदी १०० रूपयापर्यंत आहे.
स्वांतत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी महाराष्ट्रासह अवघा देश सज्ज झाला आहे. विविध शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय, शैक्षणिक संस्था व आजूबाजूच्या इतर परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या जय्यत तयारीला सुरूवात झाली आहे. मध्यम आणि लहान आकाराचे नायलॉनचे झेंडे, गाडीत ठेवण्यासाठी किंवा दुचाकीला लावण्यासाठी स्टँड असलेला तिरंगी झेंडा, शर्टाला लावण्यासाठी तिरंगी बिल्ले, तिरंगी फुगे, हातात घालण्यासाठी बँड, त्याशिवाय तिरंगी रंगाचे टी-शर्ट या वस्तूंनी मुंबईतील बाजार फुलला आहे. स्वातंत्र्य दिनाला दोन दिवस बाकी असून अगदी लहानांपासून ज्येष्ठ मंडळीही या वस्तू मोठ्या हौसेने विकत घेताना दिसत आहेत.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त कागदी आणि प्लास्टिकचे छोटे झेंडे यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. परंतु यंदा सरकारनं प्लास्टिक बंदी लागू केल्यानं प्लास्टिकचे झेंडे बाजारात पहायला मिळत नसून कागदाचे झेंडेही दिसेनासे झाले आहेत. त्याऐवजी पर्याय म्हणून नायलॉनच्या कपड्यानं बनवलेले राष्ट्रध्वज बाजारात दिसत आहेत.
हेही वाचा -
आयडॉलच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; युजीसी यादीत समावेशच नाही
कौटुंबिक छळ कायद्याचा गैरवापर! उच्च न्यायालयात याचिका दाखल