Advertisement

गणेशोत्सवात मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पिकर वापरण्याची परवानगी

11 दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे.

गणेशोत्सवात मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पिकर वापरण्याची परवानगी
SHARES

यंदा गणेशोत्सवातील तीन दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पिकर वापरण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येते. यापैकी ११ दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली असून, त्यात नवरात्रोत्सवातील दोन दिवसांचा समावेश आहे.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने ठराविक दिवशी सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करता येतो.

श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागा वगळून अन्य ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर करता येतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी दिवस निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी ११ दिवसांची यादी जाहीर केली आहे.

शिवजयंती, डॉ.आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवातील तीन दिवस, नवरात्रोत्सवातील दोन दिवस, दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस, ख्रिसमसनिमित्त २४ डिसेंबर, ३१ डिसेंबर या दिवसांचा यादीत समावेश आहे.

तर आणखी चार दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच २८ सप्टेंबर रोजी ईद – ए – मिलाद असून त्यासाठी सूट देण्यात आली आहे. मात्र चंद्र दर्शनानुसार हा दिवस ठरवण्यात येणार आहे.

गणेशोत्सवातील दुसरा, पाचवा दिवस आणि अनंत चतुर्दशी असे तीन दिवस सूट देण्यात आली आहे. तर नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमीचा दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यासाठी आणखी दिवस वाढवून द्यावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे. राज्य सरकारला तशी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



हेही वाचा

शिवजयंतीनिमित्त घोडबंदर किल्ल्यावर फडकणार 105 फूट उंच भगवा ध्वज

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा