पेट्रोल आणि डिझेल दरवाढ कमी व्हावी ही मागणी सातत्याने होत असताना दरवाढ काही थांबताना दिसत नाही. उलट पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज नवा उच्चांक गाठत आहेत. सोमवारी पेट्रोलने नव्वदी गाठल्यानंतर आज मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल 14 पैशांनी महागलं तर डिझेलच्या दरात 10 पैशांची वाढ झाली.
सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर 81 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला होता. त्यामुळे मंगळवारी मुंबईत पेट्रोल 90.22 रुपये प्रति लिटर तर डिझेल 78.69 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर लिटरमागे 82 रुपये 86 पैसे तर डिझेलचा दर 74 रुपये 12 पैसे झाला आहे. इंधनाच्या दरात अशीच वाढ होत राहिल्यास लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने भारतासह सर्व देशांना 4 नोव्हेंबरपर्यंत ईराणहून कच्चे तेल आयात करण्यावर बंदी घातली आहे. अन्यथा प्रतिबंध लावण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली.