बीडीडी चाळीचा टप्याटप्याने पुनर्विकास करताना रहिवाशांची राहण्याची व्यवस्था संक्रमण शिबिरांत करण्यात येणार आहे. वरळी सेंच्युरी मिलच्या गोपाळ नगरमध्ये उभारलेल्या संक्रमण शिबिरांची काही चाळधारकांनी नुकतीच पाहणी केली. या पाहणीनंतर संक्रमण शिबिरात राहायला गेल्यास आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था होईल, अशी प्रतिक्रिया चाळधारकांनी व्यक्त केली आहे.
बीडीडी नायगाव येथील 42 चाळींपैकी 12 ते 19 क्रमांकांच्या इमारतीतील तसेच डिलाईल रोड (नामजोशी मार्ग) येथील 7 इमारतीतील रहिवाशांनी आपली घरे खाली करून वरळीतील संक्रमण शिबिरात राहण्यास जावे, असे सांगण्यात आले आहे.
नुसते आश्वासन नको, करार करा -
चाळधारकांनी या संक्रमण शिबिरात जाण्याची तयारी दाखवल्यास पुनर्विकास वेळेत मार्गी लागेल, असा विश्वास आमदार कालिदास कोळंबकर यांनी नायगाव येथे नुकत्याच झालेल्या सभेत व्यक्त केला होता.
परंतु बुधवार 17 मे रोजी चाळधारकांचे बायोमेट्रिक्स करण्यासाठी आलेल्या म्हाडा अधिकाऱ्यांकडे चाळधारकांनी आम्हाला संक्रमण शिबिरात कोणत्या नियमानुसार पाठवत आहात? त्यासंदर्भातील लेखी करारपत्र द्या याची विचारणा केली. त्यावर संक्रमण शिबिराबाबत कोणताही पत्रव्यवहार करण्याचा अधिकार आमच्याकडे नसल्याचे उत्तर या अधिकाऱ्यांनी चाळधारकांना दिले. त्यामुळे कोणत्या आधारावर आम्ही आमची घरे खाली करायची? असा प्रश्न चाळधारकांनी उपस्थित केला आहे.
लहान खोल्या, रुग्णालय, वाहतुकीची साधने लांब -
वरळीत 24 मजल्यांच्या तीन इमारती बीडीडी चाळधारकांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यातील प्रत्येक खोली 225 चौरस फुटांची आहे. या संक्रमण शिबिराच्या जवळपास वाहतुकीचे कुठलेही साधन (रेल्वे, बस थांबा) उपलब्ध नाही.
बीडीडी चाळीतील 98 टक्के रहिवाशांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे अनेकजण धुणी-भांड्यांची कामे करतात. जवळ वाहतूक व्यवस्था नसल्याने दरवेळेस टॅक्सीसाठी पैसे खर्च करणे चाळधारकांना परवडण्यासारखे नाही. या शिबिरापासून शैक्षणिक संस्थाही दूर आहेत. नोकरदारांच्या प्रवासाचाही प्रश्न आहेच.
हा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक आमदारांनी बेस्ट प्रशासनाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. नायगावच्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना हाकेच्या अंतरावर महापालिका रुग्णालय उपलब्ध आहेत. परंतु संक्रमण शिबिरात गेल्यावर खाजगी रुग्णालयाशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसेल. त्यामुळे आम्ही सध्या ज्या स्थितीत आहोत हे, तीच स्थिती उत्तम असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
आमच्यावर विश्वास ठेवा आणि घरे खाली करून संक्रमण शिबिरात राहण्यास जा, असे स्थानिक आमदारांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु घरे खाली करण्यासाठी आमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा लेखी करार करण्यात आलेला नाही. विश्वासाने घर खाली केल्यास पुन्हा मिळेल का? कोर्टात न्याय मागण्यासाठी गेलो तर केवळ विश्वासाच्या आधारे न्याय मिळेल का? त्यामुळे पुनर्विकासापूर्वी लेखी करारपत्र करा, संक्रमण शिबिरात किती दिवसासाठी पाठवणार? हे स्पष्ट करा. त्याशिवाय आम्ही घरे खाली करणार नाही.
- अतीश कदम, रहिवासी, बीडीडी, डिलाईल रोडआम्ही सध्या राहत असलेल्या खोल्या आकाराने लहान असल्या तरी दोन चाळींमध्ये प्रत्येक समारंभासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी मुबलक जागा आहे. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्था, महापालिका रुग्णालय, शाळा, मुबलक पाणी या सर्व सुविधा आहेत. यापैकी कोणतीही सुविधा वरळीतील संक्रमण शिबिरात दिसत नाही.
- सूरज देवकुळे, रहिवासी, बीडीडी, नायगावबायोमेट्रिक्सला चाळधारकांचा आणि चाळीतील सर्व संघटनांचा विरोध असल्याने संक्रमण शिबिरात राहायला जाण्याचा प्रश्नच नाही. वरळीतील संक्रमण शिबिराच्या इमारती आपत्कालीन परिस्थितीत दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठीच्या आहेत. त्या इमारती कोणत्या अधिकाराने बीडीडी चाळधारकांना देण्यात येणार आहेत? हुकूमशाही पद्धतीचा अवलंब करून हा पुनर्विकास करण्यात येत आहे. चाळधारकांची दिशाभूल करून बीडीडी चाळींची मोकळी जागा हडपण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारला विकास करायचा असेल तर आधी चाळधारकांना व सर्व चाळीतील संघटनांना विश्वासात घ्या. त्यांच्या संमतीनेच हा विकास करा. त्यासाठी आम्ही तयार आहोत.
- डॉ. राजू वाघमारे, अध्यक्ष, अखिल बीडीडी चाळ रहिवासी महासंघ