मंत्रालयात (mantralay) प्रवेशासाठीची सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या प्रवेशावर कठोर निर्बंध येणार आहेत. सर्वसामान्यांना ज्या खात्यामध्ये काम आहे, त्याच मजल्यावर प्रवेश मिळणार आहे. याव्यतिरिक्त अन्य मजल्यांवर जाता येणार नाही.
मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेतील बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. मंत्रालयात येणारे नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुलभपणे प्रवेश मिळावा आणि सुरक्षा भक्कम राहावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महायुती (mahayuti) सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रालयाच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घेतला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.
राज्यभरातून (maharashtra) कामे घेऊन सर्वसामान्य नागरिक मंत्रालयात येतात आणि खूप गर्दी होते. या वाढत्या गर्दीचा सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांचा प्रवेश सुलभ होऊन सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येणार आहे.
मंत्रालयात प्रवेश करण्यासाठीचा पास देताना नागरिकांचे छायाचित्र काढले जाते. मात्र आता इमारतीच्या प्रवेशद्वारातही सुरक्षा अडथळे लावण्यात आले आहेत.
प्रत्येक व्यक्ती कॅमेरामध्ये दिसेल आणि त्याची ओळख, छायाचित्र व नाव बाजूला असलेल्या मॉनिटरवर येईल व ओळख पटल्यावरच त्याला प्रवेश देण्यात येईल. अशी व्यवस्था प्रत्येक मजल्यावर उभारण्यात येणार आहे.
ज्या मजल्यावर नागरिकांचे काम आहे, त्यांना त्या मजल्यावरील खात्यासाठीच पास दिला जाईल व अन्य मजल्यांवर जाता येणार नाही, अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा