मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षकांच्या मानधनात २ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असून मदतनीसांच्या मानधनातही दुपटीने वाढ करण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ५०४ बालवाड्या चालवल्या जात आहेत. यापैकी सेवाभावी संस्थांमार्फत सीएसआरअंतर्गत १०० बालवाड्या सुरू आहेत. परंतु यंदा या सेवाभावी संस्थांनी १०० बालवाड्या चालवणं शक्य नसल्याचं सांगितल्यानंतर १८ संस्थांना १० महिन्यांकरीता महापालिकेकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
यापूर्वी स्थायी समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार शिक्षकांना ३ हजार रुपये, तर मदतनीसांना दीड हजार रुपये एवढं मानधन दिले जात असे. अशाप्रकारे प्रत्येक बालवाडीसाठी मासिक ४ हजार ७०० रुपये रुपये पालिकेकडून मंजूर करण्यात आले होते. परंतु आता त्यात वाढ करून बालवाडीतील शिक्षकांना मासिक ५ हजार रुपये, तर मदतनीसांना ३ हजार रुपये अशाप्रकारे मासिक ८ हजार २०० रुपये बालवाडीसाठी निधी दिला जाणार आहे. या सर्व बालवाड्यांसाठी वर्षांला ३.२४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
सन २०१५-१६ मध्ये ५०४ बालवाडीत १३ हजार २७७ विद्यार्थी शिकत होते. त्यापैकी वयाची ५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ७ हजार १०९ विद्यार्थ्यांनी २०१६-१७ मध्ये महापालिकेतील पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यानुसार केवळ ५२ टक्केच बालवाडीतील विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या पहिल्या इयत्तेत प्रवेश घेत असल्याचं स्पष्ट होतं आहे.
हेही वाचा-
मुंबई महापालिका शाळांमध्ये आता केम्ब्रिजचा अभ्यासक्रम!