मिरा-भाईंदर (mira-bhayandar) महानगरपालिकेने (MBMC) शहरातील बेकायदेशीर फटाक्यांच्या विक्री स्टॉल्सच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. मीरा भाईंदर (bhayandar) महानगरपालिकेशी संलग्न असलेल्या अग्निशमन आणि आपत्कालीन विभागाने अशा स्टॉल्सवर पाण्याची फवारणी केली.
रविवारी महापालिकेने अठरा स्टॉल्सवर कारवाई केली. हे स्टॉल्स बेकायदेशीर होते. तसेच काही स्टॉल्स 1884 च्या भारतीय स्फोटक कायद्याच्या तरतुदींनुसार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले.
सात स्टॉल्सवर फटाक्यांवर (firecrackers) पाण्याची फवारणी करण्यात आली. तर चार स्टॉल्समधून संपूर्ण साठा जप्त करण्यात आला. हे सात स्टॉल्सचे परवाने निलंबित करण्याव्यतिरिक्त ते बंद करण्यात आले आहेत.
“लोकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या अशा बेकायदेशीर गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. आम्ही दोन स्टेशन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 29 अग्निशमन कर्मचाऱ्यांची एक टीम नियुक्त केली आहे. ज्यांना बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या स्टॉलवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तात्काळ कारवाई करण्यासाठी वॉटर टेंडर, रेस्क्यू आणि पिकअप व्हॅन प्रदान करण्यात आल्या आहेत,” असे महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले.
या सणासुदीच्या काळात नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये याची खात्री करण्यासाठी प्रशासनाने दिवाळीच्या काळात फटाके विक्रीसाठी सुरक्षा धोरण तयार केले आहे. प्रशासनाने शहरात बारा मैदाने निवडली आहेत. ज्यात सुमारे 100 स्टॉल्स बसू शकतात. जेथे फटाके विक्रेते सुरक्षित वातावरणात त्यांचे फटाके विकू शकतात.
मिरा- भाईंदर शहरातील रस्ते आणि पदपथांसह सार्वजनिक जागांवर तात्पुरते फटाके स्टॉल उभारण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर खाजगी मालकीच्या मोकळ्या जागेवर फटाक्यांची दुकाने लावण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत.