Advertisement

मुंबईतील कचऱ्यांपासून तयार होणारं खत वापरलं जातंय कोल्हापूरच्या शेतांमध्ये


मुंबईतील कचऱ्यांपासून तयार होणारं खत वापरलं जातंय कोल्हापूरच्या शेतांमध्ये
SHARES

देवनार डम्पिंग ग्राऊंड, शिवाजीनगर, बैगनवाडी आदी भागांमध्ये मुंबईतून जमा होणारा ओला कचरा आता डम्पिंग ग्राऊंडवर जाणार नाही. या भागातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेच्या एम-पूर्व विभगाने हाती घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून दिवसाला २२ टन खत निर्मिती करण्यात येणार आहे. या खताचा वापर कोल्हापूरमधील शेतांमध्ये केला जाणार आहे.


कम-पोस्ट संस्थेने उभारला प्रकल्प

'एम पूर्व' विभागातील शिवाजीनगर, बैंगनवाडी परिसरात पूर्व मुक्त मार्गालगत असणाऱ्या महापालिकेच्या जागेत कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा हा प्रकल्प 'कम-पोस्ट' या संस्थेने उभारला आहे. उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ५० टन एवढी असून सध्या या प्रकल्पात दररोज ३० टन एवढा कचरा वापरून खत तयार केले जात आहे. पुढील १५ दिवसात पूर्ण क्षमतेने वापर करून दररोज ५० टन कचरा या प्रकल्पात वापरला जाईल.


४८ तासांत खत तयार

साधारणपणे ७५ टक्के एवढे खत ४८ तासांनंतर तयार होते. या प्रकल्पाची क्षमता दररोज १०० मेट्रिक टनपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली. यापासून निर्माण होणारं खत हे कोल्हापूरमधील शेतांमध्ये वापरलं जाणार असल्याचं किलजे यांनी स्पष्ट केलं.


प्रदूषण कमी होण्यास हातभार

महापालिकेच्या 'एम पूर्व' विभागात सुमारे ८ लाख २६ हजार ७८४ एवढी लोकसंख्या असून ८५ टक्के जनता झोपडपट्टीमध्ये राहते. सध्या या विभागातून दररोज सुमारे ३९० टन कचरा संकलित होत आहे. यापैकी ३० टन कचरा या प्रकल्पात वापरला जात आहे. खतप्रकल्प कार्यान्वित झाल्यास, 'एम पूर्व' विभागातून क्षेपणभूमीवर वाहून नेल्या जाणाऱ्या कचऱ्यात सध्या ३० टनांची घट झाली आहे. त्यामुळे कचरा वहन खर्चात बचत होण्यासह प्रदूषण कमी होण्यासही हातभार लागला आहे, असेही किलजे यांनी सांगितले.


अशी होते खतनिर्मिती 

दररोज सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत कार्यरत असणाऱ्या या प्रकल्पासाठी महापालिकेचे व 'कम-पोस्ट' संस्थेचे मिळून साधारणपणे २५ कर्मचारी प्रकल्पस्थळी कार्यरत आहेत. या प्रकल्पात टाकण्यासाठीचा कचरा संकलित झाल्यानंतर प्रथम त्याचं विलगीकरण केलं जातं. त्यानंतर वेगळ्या झालेल्या ओल्या कचऱ्याची भुकटी केली जाते. भुकटी झालेला हा कचरा प्रकल्पात टाकण्यात येतो. त्यानंतरच्या ४८ तासात कचऱ्यापासून खतनिर्मिती होते. कच-यातील पाण्याचं प्रमाण कमी करणं, त्याची भुकटी करणं यासाठी याठिकाणी ७ यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.


हेही वाचा -

मराठी, गुजरातीचे शिक्षक देणार इंग्रजीचे धडे

गेट वे आॅफ इंडिया ते मांडवा प्रवाशांची लूट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा