तौक्ते चक्रीवादळाचा फटका सामान्यांसह मच्छिमारांना ही बसला. कारण तौक्ते चक्रीवादळामुळं मच्छिमारांचं मोठं नुकसान झालं असून, येत्या १ जूनऐवजी १५ जूनपासून मासेमारी बंदी लागू करण्यात यावी अशी मागणी मच्छिमारांनी केली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ नुसार १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने दिले आहेत.
मच्छिमारांच्या या मागणीला मच्छिमार कृती समितीने मात्र विरोध केला आहे. जूनमध्ये मासेमारी सुरू ठेवणे हे मच्छिमारांसाठी धोकादायक ठरू शकते असे मच्छिमार कृती समितीला वाटते. एखादे संकट ओढवले तर त्याला जबाबदार कोणाला धरणार, असा सवाल समितीने केला आहे. याचा विचार करून मच्छीमारांनी आपल्या मागणीचा पुनर्विचार करावा, अशी विनंती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केली आहे.
दरवर्षी याच कालावधीत मासेमारी बंद ठेवण्यात येते. एकतर हा मशांच्या प्रजननाचा काळ असतो, तसेच जून आणि जुलै या २ महिन्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे यामुळे समुद्रात दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने या कालावधीत शासन हा निर्णय घेत असते. मात्र, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे मच्छिमारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून हे लक्षात घेत यावेळी मासेमारी १५ दिवसांनंतर बंद करावी अशी मच्छिमारांची मागणी आहे.
वर्षभराच्या काळात योग्य प्रमाणात मासे उपलब्ध होऊ शकले नाहीत. यामुळे मच्छिमारांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या बरोबरच तौक्ते चक्रीवादळामुळे काही दिवसांसाठी मासेमारी बंदच ठेवण्यात आली होती. यात सुमारे १० दिवस वाया गेल्याचे मच्छिमार सांगतात. हेच लक्षात घेऊन शासनाने मच्छिमारांचा विचार करून अधिक १५ दिवस मासेमारी करण्याची परवानगी द्यावी असे मच्छिमारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -