अभिनेता कपिल शर्मापाठोपाठ आता वर्सोव्यातील तिवरांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 63 जणांच्या मुसक्या अखेर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आवळल्या आहेत. या 63 बंगलेधारकांविरोधात नुकताच तहसीलदारांमार्फत वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई महानगर पालिका आणि म्हाडाला अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी, मुंबई उपनगर, बाबासाहेब पारधे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सेलिब्रिटींचा समावेश असून, गुन्हा सिद्ध झाल्यास या सेलिब्रिटींना तीन वर्षे जेलची हवा खावी लागणार असून, दंडही भरावा लागणार आहे. त्यामुळे ही कारवाई अत्यंत मह्त्वाची मानली जात असून, आता या सेलिब्रिटींच्या बंगल्यावर हातोडा पडणार का? आणि त्यांना जेलची हवा खावी लागणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
कपिल शर्माने वर्सोव्यात तिवरांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम केल्याची बाब उघड झाली आणि त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणामुळे अन्य बंगलेधारकांनीही वर्सोव्यात मोठ्या प्रमाणावर तिवरांची कत्तल करत, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत अनेकांना अनधिकृत बांधकाम केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. ही बाब समोर आल्याबरोबर कांदळवण कक्ष कामाला लागले. त्यानुसार कांदळवण कक्षाने सॅटेलाईट पाहणी करत, परिसराचा अभ्यास करत साधारणत: तीन महिन्यांपूर्वी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला यासंबंधीचा अहवाल सादर केला होता, अशी माहिती सहाय्यक वन संरक्षक, कांदळवण कक्ष, मुंबई, मकरंद घोगटे यांनी दिली आहे.
या अहवालानुसार तिवरांची कत्तल करत 63 जणांनी पर्यावरण कायद्याचा भंग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पारधे यांनी सांगितले आहे. तर आता अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्याचे काम पालिका आणि म्हाडाची आहे. त्यानुसार या दोन्ही यंत्रणांना पत्राद्वारे कळवण्यात आले असून, त्यांच्याद्वारे ही कारवाई होईल, असेही पारधे यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण...
वर्सोव्यातील लोखंडवाला येथील म्हाडाच्या मालकीच्या प्रत्येकी 25 मीटरच्या भूखंडाची विक्री म्हाडाकडून करण्यात आली होती. या भूखंडावर भूखंडधारकांनी 25 मीटरपर्यंत बांधकाम करणे अपेक्षित होते. मात्र या भूखंडधारकांनी तिवरांची कत्तल करत 40 ते 50 मीटरपर्यंत बांधकाम केल्याचे समोर आले आहे. कुणी गार्डन केले आहे, तर कुणी गॅरेज तर कुणी पक्के बांधकाम केल्याचेही समोर आले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून, तिवरांची कत्तल हे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन असल्याने 63 जणांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मुळात 64 जणांनी अनधिकृत बांधकाम केले असून, त्यातील कपिल शर्मा याच्याविरोधात याआधीच गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या सेलिब्रेटींमध्ये शक्ती कपूर, शिल्पा शेट्टीच्या नातेवाईकांचा समावेश आहे.