Advertisement

एप्रिल महिन्यात गोखले पुलाची दुसरी बाजू खुली होणार

अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरा लोखंडी गर्डर रेल्वे रुळावर बसवण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे.

एप्रिल महिन्यात गोखले पुलाची दुसरी बाजू खुली होणार
SHARES

अंधेरी (andheri) पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची (gokhale bridge) दुसरा लोखंडी गर्डर रेल्वे रुळावर बसवण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. रविवारी मध्यरात्री हे जोखमीचे काम पूर्ण करण्यात आले. आता उंचावरचा हा गर्डर आठ मीटर खाली आणण्याचे काम केले जाणार आहे. पुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास एप्रिल 2025 ची मुदत देण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू 26 फेब्रुवारी रोजी सुरू झाला.  यानंतर आता दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर 15 महिन्यांनी एक बाजू सुरू झाली.

यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे भाग दिल्लीहून मुंबईत (mumbai) आणण्यास सुरुवात झाली होती. दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग येण्यास उशीर झाला. त्यामुळे पालिकेचे नियोजनही कोलमडले होते.

त्यामुळे पुलाची दुसरी बाजू सुरू करण्याची मुदतही पुढे ढकलावी लागली होती. मात्र आता हा दुसरा गर्डर रेल्वे रुळांवर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

गेल्या आठवड्यात हा गर्डर रेल्वेमार्ग परिसरात 25 मीटरपर्यंत सरकवण्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी 8 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते सोमवार 9 सप्टेंबर पहाटे 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत हा गर्डर रेल्वे भागावर सरकवण्यात आला.

एकूण 90 मीटरपर्यंत सरकविण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्वेने निर्देश दिल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे.

उंचावर असलेला हा गर्डर येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने 8 मीटरपर्यंत खाली आणण्यात येणार आहे. त्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण केली जातील. पश्चिम रेल्वे (western railway) प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर हे काम पूर्ण केले जाणार आहे.

गर्डर खाली आणल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे काम दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत तसेच महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संपूर्ण पूल सुरु होण्यास पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे.

पहिल्या बाजूवरून लवकरच अवजड वाहने…

गोखले पुलाची एक बाजू सध्या सुरू असून त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. आता दुसरा गर्डर स्थापन केल्यानंतर आधारासाठी उभारलेला लोखंडी भाग हटवण्यात येईल. त्यानंतर पुलाच्या एका बाजूवरून अवजड वाहनांना देखील प्रवेश मिळू शकणार आहे.



हेही वाचा

पनवेल : केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांना 'या' रुग्णालयात मिळणार मदत

'ST'चा विक्रम! 2.5 लाख मुंबईकरांचा ‘एसटी’नं प्रवास

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा