धारावीतील (dharavi) ज्या रहिवाशांनी 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी तळमजल्यापासून वरच्या मजल्यावरील घरे खरेदी केली आहेत. त्यांना मुंबईच्या (mumbai) इतर भागात भाडे तत्त्वावर 300 स्क्वेअर फूटाच्या घरांचे वाटप केले जाणार आहे.
अशा घरांच्या मालकांना 25 वर्षांसाठी नाममात्र मासिक भाडे द्यावे लागेल. त्यानंतर त्यांना घरांची मालकी दिली जाईल, असे गृहनिर्माण विभागाने जाहीर केलेल्या ठरावात (GR) म्हटले आहे.
धारावी झोपडपट्टी आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये (slums) गणली जाते. ही झोपडपट्टी 600 एकरावर पसरलेली आहे. धारावीचा पुनर्विकास धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL) द्वारे केला जात आहे. यात अदानी समूहाचा 80% हिस्सा आहे आणि उर्वरित रक्कम राज्य सरकारकडे आहे.
1 जानेवारी 2000 पूर्वी तळमजल्यावर घरे असलेल्या धारावीतील रहिवाशांनाच धारावीमध्ये पुनर्वसनासाठी पात्र मानले जाणार आहे.
तर अपात्र रहिवाशांचे शहरातच इतरत्र ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे, असे सरकारने यापूर्वी जाहीर केले होते.
1 जानेवारी 2000 ची कट-ऑफ तारीख शहरातील इतर सर्व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी लागू आहे.
कट ऑफ तारखेनंतर घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी पुनर्वसन प्रक्रियेस पात्र ठरण्यासाठी 2.5 लाख रुपये भरणे आवश्यक आहे.
परंतु 4 ऑक्टोबर रोजी गृहनिर्माण विभागाने जाहीर केलेल्या जीआरमध्ये असे स्पष्ट केले आहे की, धारावीच्या अपात्र रहिवाशांना कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत.
जे धारावी रहिवासी 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी वरच्या मजल्यावरील घरात राहतात त्यांना त्या घराची मालकी हक्क दर्शविणारी कागदपत्रे सादर करावी लागतील. या कागदपत्रांच्या आधारेच त्यांचे मुंबईतील इतर ठिकाणी पुनर्वसन केले जाईल, असे जीआरमध्ये म्हटले आहे.
तसेच नवीन घरांची मालकी मिळवण्यासाठी त्यांना 25 वर्षांसाठी नाममात्र भाडे द्यावे लागेल किंवा या कालावधीत कधीही एकरकमी रक्कम भरावी लागेल, असे जीआरमध्ये म्हटले आहे
या कुटुंबांना घरे (flats) खरेदी करण्यासाठी भाड्याची रक्कम किती द्यावी लागेल यावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
ज्या इमारतींमध्ये ते राहणार आहेत त्यांची देखभाल डीआरपीपीएल 10 वर्षांच्या कालावधीसाठी करेल.
आतापर्यंत, राज्य सरकारने 542.25 एकर जागा डीआरपीपीएलला मुंबईतील विविध ठिकाणी धारावीच्या अपात्र रहिवाशांच्या घरांसाठी दिली आहे.
यामध्ये देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील 125 एकर, मुलुंड आणि कांजूरमार्ग येथे 256 एकर मीठागराची जमीन, कुर्ला डेअरीची 21.25 एकर जमीन आणि मढ बेटावरील 140 एकर जमीनीचा समावेश आहे.
धारावीतील पात्र (elegible) आणि अपात्र रहिवासी ओळखण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले. हे सर्वेक्षण 18 मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात आले होते ते अद्याप सुरू आहे.
सर्वेक्षकांनी सुमारे 60,000 घरांची ओळख करून त्यांची संख्या निश्चित केली आहे आणि 25,000 घरांसाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे, असे DRPPL सूत्रांनी सांगितले.