मुंबई महापालिकेने येणाऱ्या गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा यासाठी पालिकेने परिपत्रक जारी केले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रात आगामी गणेशोत्सवात पूर्णपणे पीओपी आणि उंच गणेशमूर्तींना बंदी घालण्यात आली आहे.
कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महानगर पालिकेकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये माघी गणेशोत्सव काळात पीओपी गणेशमूर्ती असल्याने तलावात विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. यावरून मुंबई उपनगरात अनेक गणेश मंडळानी या निर्णयाचा निषेध केला होता.
मुंबई महापालिकेकडून नियमावली आल्याने आता गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार आणि राजकीय नेते काय भूमिका घेतात हे आता पाहणं महत्वाचे राहील.
उच्च न्यायालयाने मुंबई येथे दाखल PIL 96 of 2024 मधील दिनांक 30 जानेवारी 2025 रोजीच्या अंतरीम आदेशानुसार, पीओपी गणेशमूर्तींना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असून केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने 12 मे 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिका यांना दिलेले आहेत.
तर गणेश मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता महानगरपालिकेमार्फत मूर्तीकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली आहे. सार्वजनिक आणि खाजगी जागेवरील मंडपांकरीता अर्ज सादर करतेवेळी गेल्या वर्षीची मंडप परवानगी सोबत जोडावी लागणार आहे.
केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जातात असा फलक, मंडपाच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रदर्शित करावा लागणार आहे. गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचे आगमन आणि विसर्जन व्यवस्थित होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य राहिल एवढया उंचीची मूर्ती घडविण्यात यावी असा नियम पालिकेने बनवला आहे.
परिपत्रकात, बीएमसीने पुन्हा सांगितले की प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींवर कडक बंदी आहे. उंचीची मर्यादा निर्दिष्ट केलेली नसली तरी, मूर्ती स्थिर आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित असाव्यात यावर भर दिला आहे.
मागील नियमांनुसार, रस्ते आणि पदपथांवर मंडप उभारताना निर्माण होणाऱ्या प्रत्येक खड्ड्यासाठी गणपती मंडळांना 2000 रुपये आकारले जातील. याव्यतिरिक्त, मूर्तिकारांना मूर्ती पर्यावरणपूरक असल्याचे सांगणारा बोर्ड लावावा लागेल.
हेही वाचा