डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर देशभरातल्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी सकाळी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केले.
काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड, काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्यासह राजू वाघमारे यांनी देखील चैत्यभूमी येथे उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम वेगात होणे अपेक्षित होते. परंतु स्मारकाचे काम लांबणीवर पडल्याचे मत एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले. शासनाने प्रामाणिक रहावे. जनतेला फसवण्याचं काम करू नये. सरकारने बाबासाहेबांच्या स्मरकाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. बॅनरवर बाबासाहेबांचे फक्त फोटो न छापता बाबासाहेबांचे विचार पुढे न्यावेत. सी. आर. झेड च्या नावाखाली स्मारकाची जागा कमी न करता संपूर्ण साडेबारा एकर जागेत बाबासाहेबांच स्मारक व्हावे, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.