Advertisement

बोईसर-नवापूर रोडवर बाईकवरून पडून आजोबांसह चिमुकल्याचा मृत्यू

या अपघातानंतर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी निषेधार्थ बोईसर-नवापूर रस्ता रोखून धरला.

बोईसर-नवापूर रोडवर बाईकवरून पडून आजोबांसह चिमुकल्याचा मृत्यू
SHARES

पालघरमधील (palghar) बोईसर-नवापूर रोडवर सोमवारी सकाळी आजोबांसह एका 18 महिन्यांच्या मुलाचा दुचाकीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. चिमुकल्याच्या आजोबांची दुचाकी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. माहीर मोहसीन हा चिमुकला त्याचे आजोबा अहमद यांच्यासोबत दुचाकीवर बसला होता.

खड्ड्यापासून बचावासाठी अहमद यांनी ब्रेक लावल्याने माहीर दुचाकीवरून खाली पडला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले.

संतप्त नागरिक

अपघातानंतर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी निषेधार्थ बोईसर-नवापूर रस्ता रोखून धरला. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. पालघरमध्ये सोमवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला आणि दिवसा पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी खड्डेमय रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते, त्यामुळे प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला होता.

तारापूर (Tarapur) एमआयडीसीकडे (MIDC) जाणारा बोईसर-नवापूर रस्ता पावसाळा सुरू झाल्यापासून खड्डेमय झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यापुढील दुर्घटना टाळण्यासाठी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली.

सध्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही खड्डे पडले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या धोकादायक परिस्थितींना तोंड देण्यासाठी भराव टाकण्याचे काम हाती घेत आहे. मात्र, समस्या कायम राहिल्याने प्रवाशांची गैरसोय आणि धोका निर्माण होत आहे.

या भीषण अपघताची घटना काही वेगळी नाही. अहवालानुसार, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, हायवेवरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून नायगावमध्ये दोन महिलांना वेगवेगळ्या घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला होता. 

सोमवारच्या घटनेच्या अनुषंगाने बोईसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी कायम आहे.



 हेही वाचा

नवी मुंबई : लोकल ट्रेन पकडताना महिला पडली

अंधेरी : उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा