जुहू कोळीवाडा येथील समुद्रात गुरूवारी सायंकाळी पोहायला गेलेल्या काही तरुणांपैकी दोन तरुण बुडाल्याने मोठी खळबळ उडाली. ही माहिती कोळीबांधव व जीवरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ याठिकाणी धाव घेतली. बुडालेल्या तरूणांपैकी एकाला वाचविण्यात कोळीबांधव आणि जीवरक्षांना यश आले असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात आले.
सांताक्रुझ-जुहू कोळीवाडा येथील समुद्रात गुरुवारी संध्याकाळी काही तरूण पोहायला गेले होते. त्यातील दोन तरुण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. ही माहिती मिळाल्यावर स्थानिक कोळीबांधवांनी येथे तात्काळ धाव घेत आपल्या बोटीतून एका तरुणाला सुखरुप बाहेर काढले. अनिस मिर्झा (14) असे या वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. तर बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचे नाव हसन शेख (15) असे आहे. ही दोन्ही मुले वांद्रे येथे राहणारी आहेत. या तरुणाचा शोध जीवरक्षक, अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक कोळीबांधव घेत आहेत.