बुद्धीबळ... मन शांत ठेवून डाेक्यानं खेळला जाणारा खेळ. हा खेळ खेळण्यासाठी स्थिर बुद्धी आणि एकाग्र चित्त ठेवावं लागतं. प्रतिस्पर्ध्याला गाफील ठेवून त्याला शह देऊन त्याच्यावर मात करणं हा या खेळाचा मुख्य उद्देश्य असताे. पण तुम्हाला माहितेय का? बुद्धीबळामधे आपण जसं शह आणि मात देऊ शकताे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा आवडता खेळ क्रिकेटमधेही पायचीत केले जाते, तेही समाेरच्या खेळाडुला गाफील ठेवून!
बुद्धीबळ आणि क्रिकेटमधील साधर्म्यच जणू हे! अनेक क्रिकेट खेळाडूंना स्टंपच्या मागून चेकमेट करणारा 'माही' हा असंख्य क्रिकेट प्रेमीच्या गळ्यातील ताईत आहे. क्रिकेटच्या शिरपेचातील याच मनस्वी राजाला विश्वविक्रमी पोट्रेटनं मानवंदना देण्यात आली आहे.
भारताचा सुप्रसिद्ध कुल कॅप्टन महेंद्रसिंग धाेनीचा ७ जुलैला वाढदिवस साजरा झाला. आपल्या लाडक्या क्रिकेटवीराचा वाढदिवस आणि वर्ल्डकपची क्रेझ असे दाेन्ही आैचित्य साधून त्याला शुभेच्छा देण्यासाठी कॅप्टन कुल धोनीची भली मोठी प्रतिकृती साकारण्यात आली. बुद्धीबळच्या प्याद्यांचा वापर करून ही कलाकृती सादर करण्यात आली आहे. आबासाहेब शेवाळे या कलाकाराची ही संकल्पना असून ३० हून अधिक इतर कलाकारांनी यासाठी त्याला साथ दिली.
वर्ल्ड रेकॉर्ड हाेल्डर आर्टिस्ट चेतन राऊत, मुकेश साळुंखे, संदीप बाेबडे, ऋषिकेश झगडे, ऋषिकेश माने, मिलिंद भुरवणे, स्वप्निल खाडे, रुपेश तांडेल यांचं सहकार्य आबासाहेब शेवाळे यांना लाभलं. जवळपास १३ दिवस यासाठी मेहनत घेण्यात आली. या कलाकृतीसाठी सुमारे १ लाख ४१ हजार लाल, काळ्या, फिकट पांढ-या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा विविध रंगांच्या प्याद्यांचा वापर केला गेला आहे. या पाेट्रेटची लांबी ३० फुट आणि रूंदी २० फुट आहे.
भारताला कला, क्रिडा, शास्त्र याचा अमूल्य असा वारसा लाभलाय. भारतातील अनेक प्रतिभावंत कलावंत आपल्या अभूतपुर्व कलेतुन आपल्या भारताचं नावं जगाच्या इतिहासात काेरत असतात. महाराष्ट्राच्या मातीतील अशाच एका विश्वविक्रमवीर, तरूणाची निवड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं २०१८-१९ च्या सर्वोत्कृष्ट १०० मध्ये केली आहे. आबासाहेब शेवाळे यांनी यापूर्वी तीन विश्वविक्रम केलेत.
आबासाहेब हे पुशपिन्सपासून माेझेक पाेट्रेट बनवण्यात सुप्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे त्यांनी पुशपिन्सपासुन माेझेक पाेट्रेट बनवले आहेत. महेंद्रसिंग धाेनी,अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि अनेक दिग्गजांचा यात सहभाग आहे. त्यांच्या या पुशपिन्स पाेट्रेटसची नाेंद लिम्का बुकमधे नाेंदवली आहे.
याशिवाय त्यांनी शिवाजी महाराजांचे कागदी पिशव्यांपासून बनवलेले माेझेक पाेट्रेट याची नाेंद युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालीय. तसंच ऑक्टोबर २०१८ मध्ये विराट काेहलीचं सर्वात माेठं मातीच्या पणत्यांपासून बनवलेल्या माेझेक पाेट्रेटची नाेंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालीय.
आता आबासाहेब शेवाळे आणि त्यांची टीम आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी सज्ज झाली आहे. बुद्धीबळाच्या साेंगट्यांचा वापर करत आबासाहेब यांनी अद्वितीय कलाकृती सादर केली आहे. क्रिकेट विश्वातील एक असामान्य व्यक्तिमत्व. एक असा चेहरा ज्याला अवघी दुनिया 'माही' म्हणून आेळखते.
तुम्हाला जर ही कलाकृती पाहायची असेल तर ठाण्याच्या कोरम मॉलला भेट देऊ शकता. १४ जुलैपर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत तुम्ही ही कला पाहू शकता.
हेही वाचा