राज्य सरकार आणि प्रशासन कोरोना व्हायरससोबत मुकाबला करत असताना शहरातील अनेक नामवंत व्यक्ती, संस्था देखील या लढ्यात त्यांची साथ देताना दिसत आहेत. क्रिकेट या खेळाची शहरातील मोठी संघटना अशी ओळख असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने (mumbai cricket association) गुरूवारी महाराष्ट्र सरकारला ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. एमसीएचे (MCA) सचिव संजय नाईक यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा- 3 महिन्यांचं रेशन मोफत मिळणार, निर्मला सीतारामन यांची घोषणा
सहाय्यता निधी देणार
यासंदर्भात माहिती देताना संजय नाईक म्हणाले की, मुंबई क्रिकेट असोसिएशनची गुरूवारी बैठक झाली. या बैठकीत कोरोनाशी (coronavirus) लढा देण्याकरीता ५० लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव करण्यात आला. हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (cm relief fund) जमा करण्यात यावा, अशी सूचना एमसीएच्या एका सदस्याने केली होती. ही सूचना मंजूर करण्यात आली असून त्यानुसार निधी जमा करण्यात येईल.
स्टेडियमची उपलब्धता
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. कोरोनाबाधित (COVID-19) रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना इतरांपासून वेगळं ठेवण्यात येतं. त्यांच्यातील व्हायरसची लागण इतरांना होऊ नये म्हणून आयसोलेशन वाॅर्डमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. पुढं जाऊन आयसोलेशन वाॅर्डची किती गरज लागेल, हे सांगता येत नाही. तरीही त्यासाठी एमसीएने स्वत: हून पुढाकार घ्यायचं ठरवलं आहे.
कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुढे जाऊन गरज पडल्यास दक्षिण मुंबईतील चर्चगेट इथं असलेलं एमसीएच्या ताब्यातील वानखेडे स्टेडियम (wankhade Stadium) सरकारला सुपूर्द करण्यात येईल. या ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करता येऊ शकेल, अशी माहिती देखील नाईक यांनी दिली.
हेही वाचा- राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, आमदार-खासदारांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार