भारताचा कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरोधात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील १० हजार धावा पूर्ण केल्या अाहेत. २०५ एकदिवशीय सामन्यात १० हजार धावांचा टप्पा गाठत विराटने सर्वाधिक वेगवान धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला अाहे. सचिने २५९ सामन्यांमध्ये १० हजार धावा केल्या होत्या.
वन डे मध्ये १० हजार धावा करणारा विराट जगातील १३ वा तर भारतातील ५ वा फलंदाज ठरला अाहे. विंडीजविरोधात गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराटने १४० धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात ८१ धावांची भर घालत कोहलीने सर्वात वेगवान १० हजार धावा करण्याचा विक्रम केला. या सामन्यात विराटने सलग दुसरे शतक झळकवत १५७ धावा केल्या. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३७ शतके आणि ४९ अर्धशतके झळकावली आहेत.