टीम इंडियाचा बॉलर शार्दुल ठाकूर याच्या आई - वडिलांचा अपघात झाल्याने दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वांद्र्याच्या लिलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. शार्दूलचे वडील नरेंद्र ठाकूर यांना लिलावती रुग्णालयातील आयसीयू विभागात दाखल केलं आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
एका लग्न समारंभातून परतत असताना पालघर जवळ शार्दुलचे वडील नरेंद्र आणि आई हंसा ठाकूर दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. केळवा-माहीम रोडला त्यांचा अपघात झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
सध्या नरेंद्र ठाकूर पूर्णपणे शुद्धीवर आहेत आणि ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं लिलावती रुग्णालयातील कार्डिअॅक सर्जन डॉ. वी. रविशंकर यांनी सांगितलं आहे.
शार्दुल मुंबई रणजी संघाचा सदस्य आहे. त्याने ३१ ऑगस्ट २०१७ मध्ये श्रीलंकेविरोधात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील दहाव्या चेंडूवर त्याच्या करिअरमधील पहिली विकेट घेतली होती. नोव्हेंबर २०१२ मध्ये राजस्थानविरोधात प्रथमश्रेणीच्या सामन्यात पर्दापण केलं होते. शार्दुल सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत आहे.
मंगळवारी संध्याकाळीच शार्दुलची इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिका दौरा आणि श्रीलंकेविरोधातील मालिकेसाठी भारतीय संघात होता.