शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विजय मांजरेकर व रमाकांत देसाई स्मृती चषक एसपीजी-एलआयसी टी-२० क्रिकेट स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार अाहे. डी. वाय. पाटील स्पोर्टस क्लब अाणि पार्कोफिन क्रिकेट क्लब यांच्यात उद्घाटनाचा सामना रंगणार अाहे.
भारताचा माजी कसोटीपटू रमेश पोवार याच्या हस्ते गुरुवारी सकाळी ९ वाजता शिवाजी पार्क जिमखान्याच्या खेळपट्टीवर या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येणार अाहे. यावेळी शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आमरे, चेअरमन अविनाश कामत, सचिव संजीव खानोलकर, सहाय्यक सहसचिव सुनील रामचंद्रन, क्रिकेट विभागाचे सेक्रेटरी पद्माकर शिवलकर आदी मंडळी उपस्थित असतील.
तिसऱ्या एसपीजी-एलआयसी टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये १० संघ सहभागी होणार अाहेत. गतविजेता नॅशनल क्रिकेट क्लब, गतउपविजेता पय्याडे स्पोर्टस क्लब, कर्नाटक स्पोर्टस असोसिएशन, मुंबई पोलीस जिमखाना, डी. वाय. पाटील स्पोर्टस क्लब, पार्कोफिन क्रिकेट क्लब, न्यू हिंद, दादर यूनियन स्पोर्टिंग क्लब, सिंद स्पोर्टस क्लब यांच्यासह यजमान शिवाजी पार्क जिमखाना हे संघ विजेतेपदासाठी झुंजतील.
स्पर्धेची उपांत्यपूर्व लढत २३ मार्चला तर उपांत्य फेरी लढत २४ मार्च रोजी शिवाजी पार्कात होईल. प्रतिष्ठेचा विजय मांजरेकर व रमाकांत देसाई स्मृती चषक अाणि एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविण्यासाठी २५ मार्च रोजी दुपारी २.०० वाजता अंतिम चुरस मुंबईकरांना पाहायला मिळेल. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होईल. या स्पर्धेच्या उपांत्य अाणि अंतिम फेरीचे सामने www.mumbailive.com या संकेतस्थळावर पाहता येतील.
हेही वाचा -
डब्ल्युडब्ल्युई चॅम्पियन 'जेबीएल' खेळला शिवाजी पार्कमध्ये फुटबाॅल